नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. धार्मिक विधी, अंधश्रद्धा आणि भीती यांचा आधार घेत खरातने केवळ महिलांचे शोषणच नाही, तर आर्थिक फसवणुकीचेही मोठे जाळे उभे केले होते, अशी माहिती तपासातून उघड होत आहे. आधी तुर्कीवरुन आणलेलं मध हे कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून एक किलो मध 9 लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आल्यानंतर आता खरातने चिंचोक्यांच्या माध्यमातूनही भक्तांना लाखोचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. मात्र लोक चिंचोक्यांसाठी लाखो रुपये काय द्यायचे? नेमकी काय माहिती समोर आलीये पाहूयात…
1 लाख रुपयांचा एक चिंचोका, पण का?
अशोक खरात प्रकरणामध्ये तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे साधे चिंचोके ‘दैवी शक्तीचे’ असल्याचे सांगत खरात ते लाखो रुपयांना विकत होता. एका चिंचोक्यासाठी खरातने तब्बल एक लाख रुपये उकळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भोळ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तो पैसे उकळत होता. काही दाव्यांनुसार हेच चिंचोके पॉलिश करुन खरात हा चिंचोका नसून रत्न असल्याचं सांगत ते भक्तांना परिधान करायलाही सांगायचा. खरातच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन भक्त हे चिंचोके विकत घ्यायचे.
नकली सापच्या मदतीने फसवणूक
याहूनही गंभीर बाब म्हणजे, नकली साप आणि वाघाच्या कातडीचा वापर करून तो लोकांमध्ये दहशत निर्माण करत असे. रिमोटवर चालणारा बनावट नाग हालताना दाखवून “दैवी शक्ती प्रकट झाली” असा आभास निर्माण केला जात होता. तसेच, वाघाचे कातडे दाखवून पूजाविधीसाठी आलेल्या भाविकांची तो फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
9 लाख रुपये किलो मध
भोंदूबाबा अशोक खरातचे आर्थिक फसवणुकीचे बरेच कारनामे चौकशीदरम्यान उघड झाले असून यात मधाच्या माध्यमातूनही तो लोकांना गंडवायचा हे सिद्ध झालं आहे. खरातने तुर्की मधाच्या नावाखाली अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांची फसवणूक केली आहे. तुर्कीवरुन आणलेलं मध विशेष असून ते कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करत खरातने अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दराने मधाची विक्री केली. लैंगिक समस्यांसंदर्भातील अडचणी घेऊन येणाऱ्यांना खरातकडून या मधाची विक्री केली जायची. या मधाला ‘एल्विश हनी’ असून त्याची विक्री करताना ते तुर्कीच्या समुद्रात खोल गुहेतून मिळत असल्याचा दावा करुन विक्री केली जायची.एक किलो मधाची बाटली खरात तब्बल 9 लाख रुपयांना विकायचा. एवढ्या महागड्या दराने मध विक्री करून आलेली रक्कम त्याच्या ट्रस्टच्या नावे घेत ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती समोर आली आहे.
आज संपतेय खरातची कोठडी
अशोक खरातची सोमवारी एसआयटीकडून तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वतः ही चौकशी करत आहेत. अशोक खरातची पोलिस कोठडी आज संपणार असून अशोक खरातला आज दोन वाजेच्या सुमारास नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरातवर आता पर्यंत 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज न्यायालयासमोर हजर करण्यापूर्वीही खरातची कसून चौकशी केली जात आहे. खरातची कोठडी वाढवून मिळण्याची मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे.









