बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान किती धार्मिक आहे याची कल्पना तिच्या सोशल मीडियावरुन नेहमीच येत असते. सारा अली खान नेहमीच केदारनाथ धाम आणि इतर मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात असते. सोशल मीडियावर ती फोटो शेअर करत याची माहिती देत असते.
साराला केदारनाथ धामबद्दल फार आस्था आहे. तिचा पहिला चित्रपट केदारनाथवरच आधारित असल्याने एक भावनिक नातंही आहे. पण आता मात्र तिला मंदिरात दर्शन घेणं कठीण होणार आहे.
सारा अली खान याआधी जितक्या सहजपणे केदारनाथ धामचे दर्शन घेत होती, तितकं तिला यापुढे शक्य होणार नाही. साराला आता दर्शन घेण्यासाठी एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे.
सारा अली खानला आता आपण सनातनी आहोत याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. नुकतंच बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) हा आदेश जारी केला आहे. 17 मार्चला चार धाम यात्रेच्या पत्रकार परिषदेत गैर सनातनींना मंदिरात प्रवेश बंदी असल्याचं सांगण्यात आलं.
या पत्रकार परिषदेदरम्यान, BKTC चे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी स्पष्ट केलं की, गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ज्या कोणाचीही ‘सनातन’वर श्रद्धा आहे, ती व्यक्ती सनातनी आहे, असा ठाम दावा त्यांनी केला.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, मंदिरात दर्शनासाठी येण्याकरिता साराला आपण सनातनी असल्याचं जाहीर करणारं एक प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य असेल. केवळ त्यानंतरच तिला मंदिरात प्रवेश दिला जाईल.
“जर सारा अली खाननेही आपली सनातन धर्मावर श्रद्धा आणि भक्ती असल्याचं मान्य केलं आणि तसं प्रतिज्ञापत्र आमच्याकडे सादर केलं तर आम्ही नक्कीच तिच्या दर्शनाचीही सोय करू,” असं त्यांनी सांगितलं आहे.
सारा अली खानच्या 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ या पहिल्या चित्रपटाचं संपूर्ण शुटिंग याच ठिकाणी पार पडले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. तेव्हापासून, सारा दरवर्षी या मंदिराला भेट देऊन भगवान शंकराचा आशीर्वाद घेत असते.
केदारनाथची तीर्थयात्रा करणे आणि तिथे जाऊन आराध्य दैवताची आराधना करणे, हा तिने आपल्या वैयक्तिक नित्यक्रमाचाच एक भाग बनवला आहे.









