Search
Close this search box.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना कोणत्याही क्षणी अटक? अल्पवयीन भिक्षूंच्या मेडिकल रिपोर्टमधून लैंगिक शोषण झाल्याचं उघड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 अल्पवयीन शिष्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद अडचणीत येण्याची शक्यता असून, दिवसेंदिवस त्यांचा पाय आणखी खोलात जात आहे. पीडित अल्पवयीन मुलांच्या वैद्यकीय अहवालात मुलांचं लैंगिक शोषण झाल्याची पुष्टी झाली आहे. बुधवारी पोलिसांनी पीडित दोन्ही मुलांची वैद्यकीय चाचणी केली होती. तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनी मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. यामुळे स्वामी अविमुक्तेश्वरानंद कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर कायदेशीर कारवाईचा फास आवळला जाऊ शकतो. दरम्यान स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात अंतरिम जामीन याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती जितेंद्र कुमार यांच्या एकल जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान पोलीस न्यायालयात वैद्यकीय अहवाल सादर करतील. वैद्यकीय अहवालाच्या आधारावर उच्च न्यायालय स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा झटका देऊ शकतं. जर त्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे.

 

झुंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, त्यांचे शिष्य मुकुंदानंद गिरी आणि तीन अज्ञातांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झूंसी पोलीस ठाण्यात पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हा खटला दाखल झाला आहे. आतापर्यंतच्या तपासात अरविंद मिश्रा आणि प्रकाश उपाध्याय यांची नावंही उघड झाली आहेत. माघ मेळ्यात स्नानामुळे प्रसिद्धीझोतात आलेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर आशुतोष ब्रह्मचारी यांनी दोन लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

याप्रकरणी 173 (4) अंतर्गत जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर, बलात्कार आणि पॉक्सो विशेष न्यायालयाचे एडीजे विनोद कुमार चौरसिया यांनी झुंसी पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी झुंसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला कट रचल्याचा दावा

दरम्यान, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपांना त्यांनी सरकारचा कट म्हटलं आहे. त्यांनी या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे. जनतेचा उत्तर प्रदेश पोलिसांवर विश्वास नाही आणि म्हणूनच, या आरोपांची चौकशी दुसऱ्या राज्यातील पोलिसांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

अजून 20 बटुक म्हणजेच शिष्य अडकल्याचा दावा

राजस्थान आणि बिहारसारख्या राज्यांमधून मठात मुलांना आणण्यात आल्याचा आरोपही मुलांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 20 इतर भिक्षू देखील कथित अत्याचाराचे बळी ठरले आहेत. परंतु भीती आणि दबावामुळे ते पुढे येण्यास घाबरत आहेत. काही आरोपींचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की, कथित प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तींसह अनेक बाहेरील लोक मठ परिसरात वारंवार येत असत. त्यांनी सार्वजनिकरित्या कोणतीही नावे उघड केली नसली तरी, त्यांनी त्यांची ओळख पटवल्याचा दावा केला. विरोध केला तर त्यांना तोंड बंद करण्याची धमकी दिली जात होती.

admin
Author: admin

और पढ़ें