सावर्डे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक असलेले आरटीओ तपासणी अहवाल आणि डीएआर फॉर्म देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्या पथकाने केली. मनीष कांबळे यांनी मागितलेल्या 25 हजार रुपयांपैकी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.
त्रयस्त व्यक्तीमार्फत लाच स्वीकारली
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना विम्याचा दावा करण्यासाठी पोलिसांकडून आरटीओ तपासणी अहवाल आणि डीएआर (Detailed Accident Report) आवश्यक होता.
या कागदपत्रांसाठीच संबंधित अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम थेट न स्वीकारता त्रयस्त व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारण्यात आली होती.
गुन्हा दाखल, पोलिस दलात खळबळ
या प्रकरणात मनीष कांबळेसह अभिजीत शिर्के याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. सावर्डे परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू असून जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
माळशिरस पंचायत समितीत लाचकांड
माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक (वय 56) यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या पथकाने केली. तक्रारदाराने धर्मपुरी येथे सभा मंडपाचे काम पूर्ण करून त्याचे बिल सोलापूर कार्यालयाकडे सादर केले होते. संबंधित बिल सोलापूरहून माळशिरस पंचायत समितीकडे आल्यानंतर काम पूर्ण झाल्याचा दाखला गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळवून देण्यासाठी नागटिळक यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली होती.
तडजोडीनंतर 5 हजार स्वीकारताना सापळा
तक्रारदाराने या मागणीबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पंचायत समिती कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर 5 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना नागटिळक यांना रंगेहात पकडण्यात आले.
गटविकास अधिकाऱ्यांची पडताळणी निष्कलंक
या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली; मात्र त्यांच्या पडताळणीत कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही. आरोपीविरुद्ध पुढील गुन्हा नोंद प्रक्रिया सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, लेडीज पोलीस कॉन्स्टेबल माकर, पोलीस कॉन्स्टेबल तावरे, कुमकर व चालक दिवेकर यांच्या पथकाने केली.









