महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महिला मतदरांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात महत्त्वाचा इशारा दिला आहे.
राज ठाकरेंनी अनेक प्रश्नांना उत्तर देताना लाडकी बहीण योजनेबद्दलही भाष्य केलं. राज यांनी या योजनेसंदर्भात नेमका काय इशारा दिला आणि ते काय म्हणाले जाणून घेऊयात.
मराठी लोकांमध्ये कडवटपणा नाही
राज ठाकरेंनी मराठी भाषेसंदर्भात मराठी लोकांमध्ये कडवटपणा दिसत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. “भाषा हा मुद्दा अजूनही महाराष्ट्रात रुझायचा आहे. महाराष्ट्रात कडवटपणा नाही. तामिळ, केरळ, गुजरात्यांमध्ये दिसतो कडवटपणा. भाषा हे अस्तित्व आहे. जमीन आणि भाषा हातून गेली की परत येत नाही. आणि तुमचं अस्तित्व सापडत नाही. हा जगाचा इतिहास असून याचं भान महाराष्ट्रानं ठेवणं गरजेचं आहे. हाती काही लागणार नाही,” हे समजणं महत्त्वाचं असल्याचं राज ठाकरेंनी नमूद केलं. एवढ्यावरच न थांबता ‘हाती काही लागणार नाही’ हे पटवून देण्यासाठी राज यांनी ‘लाडक्या बहिणी’चं उदाहरण दिलं.
लाडक्या बहिणींना इशारा
“लाडकी बहिणीचे 1500 रुपये देतात. आता या 13 तारखेला दोन महिन्याचे पैसे देणार आहेत, अशी बातमी वाचली. निवडणुकीच्या तोंडावर असे पैसे वाटणार. तसे पैसे तर ते वाटतच आहेत आता ऑफिशिएअली पण वाटणार,” असा टोला राज यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना लगावला. “महागाईमध्ये हे पैसे (लाडक्या बहिणीचे 1500 रुपये) कसे टीकणार? महागाईतून दिलेल्या रक्कमेच्या 50 पट पैसे काढत आहेत,” असं म्हणत राज यांनी महिलांना इशारा दिला.
उद्याची पिढी म्हणेल, माझ्या आजी-आजोबांनी पैसे…
पुढे बोलताना, “पुढच्या पिढ्यांसाठी महाराष्ट्र काय करतोय? उद्या त्या पिढ्या म्हणतील माझ्या आजी आजोबांनी पैसे घेतले त्यांना काय वाटले. माघार घेतलेल्यांच्या मुलांना काय वाटत असेल. त्या मुलांवर काय संस्कार करतो. त्यांच्या मित्रांना काय वाटत असेल की याच्या वडिलांनी पैसे घेऊन माघार घेतली. जरा पण विचार आपल्याकडे होत नाही,” अशी खंत राज यांनी व्यक्त केली.
विकास केला म्हणता मग पैसे वाटण्याची का वेळ येते?
लाडकी बहिण योजना ही विधानसभेला निर्णायक योजना ठरल्याच्या मुद्द्यावरुन बोलताना राज ठाकरेंनी, “या योजना नसताना मतदान झालेलं ना तुम्हाला? तुम्ही काम केली म्हणता ना. विकास केला म्हणता मग पैसे वाटण्याची का वेळ येते. लोक तुमचा विकास बघून करतील मतदान,” असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
राज्यकर्ते कुठे घेऊन चाललेत महाराष्ट्राला?
“माझं म्हणणं आहे की या गोष्टीबद्दल लोकांनी जागृक रहावं. हे आता देत आहेत (लाडक्या बहिणीचे 1500 रुपये). ते महागाईमधून काढून घेत आहेत. ही टीकणारी गोष्ट नाही. मी सल्ला देत नाहीयेत. ही सिस्टीम गेली तर महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही. अनेक टिकाणी झालाही आहे तसा. राज्यकर्ते कुठे घेऊन चाललेत महाराष्ट्राला? सगळ्या गोष्टींचं भान सुटलं आहे,” अशा शब्दांमध्ये राज यांनी चिंता व्यक्त केली.
…मग सुज्ञ नागरिक म्हणतो मला काय करायचं आहे?
“निवडणुका जिंका हरा पण आपण सामाजिक परिस्थिती बिघडवतोय याचंही भान नाही आपल्याला. आजच्या यशासाठी पुढलं काय बरबाद करत आहात हे समजत नाही. तुमच्या सत्तेचा हवारटपणामुळे आपण काय गमावतोय? आपण महाराष्ट्र सत्व गमावतोय. देशातील राज्य ज्या महाराष्ट्राकडे आदराने, आशेने बघायची त्याची ही परिस्थिती केली आपण! मग सुज्ञ नागरिक म्हणतो मला काय करायचं आहे? राजकारणाबद्दल अनास्था वाढते,” असंही राज यांनी म्हटलं.
आता ही शेवटची निवडणूक यानंतर निवडणूक होणार नाही, याचा अर्थ काय?
शेवटची निवडणूक चुकाल तर संपाल. आता ही शेवटची निवडणूक यानंतर निवडणूक होणार नाही. इतकी निर्वाणीची भाषा करण्यासारखी परिस्थिती आहे का? असा सवाल विचारला असता राज यांनी, “तशी परिस्थिती आहेच. हिंदी सक्तीच्या वेळी मी बोललो होतो. की ही केवळ हिंदी सक्ती नाही हे चाचपडणं आहे. टॅप करुन बघत आहेत मराठी माणूस जागा आहे का? झोपला आहे? त्याला काही वाटतंय का? तपासून पाहणं होतं. त्यांचा सगळा खेळ इथल्यांचा नाही. यांच्या हातात तरी काय आहे. हिंदी सक्तीचं वरुन तपासून पाहायला सांगितलं. अनेक गोष्टींचे यामुळेच प्लॅन सुरु आहेत. का चालू आहेत कशासाठी चालू आहेत. संपूर्ण राज्याचं स्वास्थ बिघडावयाचं, हा कोणता खेळ सुरु आहे?” असा सवाल राज यांनी केला.









