Search
Close this search box.

मुंबई सेंट्रलला इमारतीत आग, चौकोनी कुटुंब अडकलं, काँग्रेस आमदाराचा व्हिडिओ कॉलवरुन धीर, फायर ब्रिगेडमुळे सुखरुप सुटका

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई सेंट्रल परिसरातील एका तीन मजली इमारतीतील खालच्या मजल्यावर रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. यावेळी इमारतीच्या वरच्या मजल्यावर दोन मुलांचा समावेश असलेलं चौघा जणांचं कुटुंब अडकलं होतं. या कुटुंबाला आधी व्हिडिओ कॉलद्वारे धीर देण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘टर्नटेबल लॅडर’च्या (फिरती शिडी) मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

गिल्डर लेनवरील हिरा मंजिल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत रविवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली. यातून एका वृद्ध महिलेसह एकूण आठ जणांची सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, टर्नटेबल लॅडर, रुग्णवाहिका आणि इतर आवश्यक उपकरणांचा वापर करुन ही बचाव मोहीम राबवण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाच तासांच्या प्रयत्नांनी आग विझली

सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे ५:०५ वाजता अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक आमदार अमीन पटेल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, या इमारतीत पारशी समाजातील अनेक कुटुंबे राहतात.

व्हिडिओ कॉलवर धीर दिला

तिसऱ्या मजल्यावर अडकलेले एक कुटुंब प्रचंड घाबरलेले होते. अमिन पटेल म्हणाले, “आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. त्यांना कोणत्या दिशेला जायचे आहे, याबद्दल सूचना देत होतो आणि घाबरु नका असे सांगत होतो. अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते.”

बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर, अमिल पटेल यांनी जवळच्या एका हॉटेलमध्ये त्या कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांना कपड्यांसह इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करुन दिल्या.

पायऱ्यांवरुन वृद्धेची सुटका

पहिल्या मजल्यावरून पायऱ्यांच्या मार्गाने वाचवण्यात आलेल्या एका वृद्ध महिलेला पोलीस व्हॅनद्वारे ‘एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल’मध्ये नेण्यात आले. तिथे आपत्कालीन विभागात उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आग विझवताना मेमनवाडा अग्निशमन केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उजव्या हाताच्या तळव्यावर जखम झाली. त्यांना रुग्णवाहिकेतून नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे त्यांच्या जखमेवर टाके घालण्यात आले आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

या आगीत विद्युत यंत्रणा, लाकडी फर्निचर, पार्टिशन्स, कपाटे, बेड, दरवाजे, खिडक्या, छतावरील पंखे, स्प्लिट एसी युनिट, टेलिव्हिजन संच, महत्त्वाची कागदपत्रे आणि घरातील इतर वस्तूंचे नुकसान झाले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, परंतु या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जाणार आहे.

दिवाळीत मुंबईत आगीच्या ४९९ घटनांचे कॉल

दिवाळीच्या काळात, ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान मुंबई अग्निशमन दलाला आगीच्या एकूण ४९९ घटनांचे कॉल आले होते, त्यापैकी ३३३ घटना फटाक्यांशी संबंधित होत्या. प्रमुख घटनांमध्ये ९ नोव्हेंबर रोजी मालाडमधील फटाक्यांच्या दुकानात लागलेल्या आगीचा समावेश आहे, तिथे दुकानात रॉकेट पडल्यामुळे झालेल्या स्फोटांत शाहनवाज नियाझ खान (१६) याचा मृत्यू झाला. १० नोव्हेंबर रोजी सायनमधील प्रतीक्षा नगर येथे कामगारांच्या ११ झोपड्यांपैकी सहा झोपड्या आगीत जळून खाक झाल्या; या घटनेत एलपीजी सिलिंडरचे स्फोट झाले आणि एक अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला.

admin
Author: admin

और पढ़ें