बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या तिच्या एका खास लूकमुळे नवा वाद निर्माण झाला असून, या प्रकरणी तिला कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. करिनाने दिवाळीच्या फोटोशूटमध्ये परिधान केलेल्या ऐतिहासिक पेंडंटवर पवित्र कुरआनमधील ‘आयत-अल-कुर्सी’ कोरलेली असल्याने काही जणांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. धार्मिक आयत असलेला दागिना फॅशन म्हणून वापरल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दिवाळीच्या लूकमधील शाही दागिन्याची चर्चा
दिवाळीच्या निमित्ताने करिना कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने बेज रंगाचा काफ्तान आणि टर्बन असा वेगळा लूक केला होता. तिच्या या पारंपरिक अंदाजासोबत लक्ष वेधून घेतले ते तिने परिधान केलेल्या खास पेंडंटने. हा दागिना साधासुधा नसून भोपाळच्या शाही घराण्याशी संबंधित ऐतिहासिक वारसा असल्याचे सांगितले जाते. सुमारे ३० कॅरेटच्या पाचूपासून तयार करण्यात आलेल्या या पेंडंटवर ‘आयत-अल-कुर्सी’ कोरलेली आहे. त्यामुळे या दागिन्याला धार्मिक आणि ऐतिहासिक असे दोन्ही महत्त्व असल्याचे म्हटले जाते.
सैफसोबतच्या लग्नानंतर मिळाला वारसाहक्काने दागिना
मिळालेल्या माहितीनुसार, हे पेंडंट मूळचे भोपाळच्या बेगमचे असून शाही घराण्याच्या वारशाचा भाग आहे. अभिनेता सैफ अली खानसोबत विवाह झाल्यानंतर हा दागिना वारसाहक्काने करिनाकडे आल्याचे सांगितले जाते. करिनाची स्टायलिस्ट रिया कपूर हिनेही सोशल मीडियावर या दागिन्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीविषयी माहिती दिली होती. त्यामुळे करिनाच्या दिवाळी लूकमधील या पेंडंटची चर्चा अधिक रंगली.
धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
करिनाने हा दागिना परिधान केल्याच्या पद्धतीवर सामाजिक कार्यकर्ते अब्बास हाफीज आणि मुस्लिम समुदायातील काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. पवित्र कुरआनमधील आयत कोरलेल्या दागिन्याचा फॅशन अॅक्सेसरी म्हणून वापर केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर करिना कपूर किंवा तिच्या प्रतिनिधींकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या वादावर अभिनेत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







