भूतानमधील शिंताफू हिमनदीचे सरोवर उशिरा फुटल्याने प्रचंड विध्वंस झाला. प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा, गासा त्साचू, पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला. पुनाखा-गासा महामार्गाच्या काही भागाचेही नुकसान झाले, त्यामुळे वाहतूक थांबवावी लागली. तथापि, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सरोवरातून पाणी सोडल्यामुळे संकोश नदीला पूर आला. ही नदी भूतानमध्ये उगम पावते, आसाम आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातून वाहते आणि नंतर ब्रह्मपुत्रेला मिळते. या पार्श्वभूमीवर, दोन्ही राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे प्रशासनाने 10 हजारहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी आणि मदत शिबिरांमध्ये हलवले आहे. लोकांना सतर्क करण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर घरे सोडण्याचे आवाहन करण्यासाठी रात्रभर सायरन वाजवण्यात आले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
पाणी भारतात पोहोचण्याची शक्यता
जर भूतानमधील शिंताफू हिमनदीचे सरोवर फुटले, तर त्यात साठलेले पाणी नद्यांमार्फत भारतात पोहोचू शकते. हे पाणी प्रथम भूतानच्या मो छू नदीत वाहील. मो छू आणि फो छू नद्या नंतर एकत्र येऊन पुनात्सांगछू नदी तयार होते. ही नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन भारतात प्रवेश करते. भारतात ती संकोश नदी म्हणून ओळखली जाते. तिच्या पाण्यामुळे पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार आणि जलपाईगुडीच्या सखल भागांमध्ये, तसेच आसाममधील कोकराझार आणि धुबरी जिल्ह्यांमध्ये पूर येऊ शकतो. संकोश नदी नंतर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. अशाप्रकारे, भूतानमधील सरोवरातील पाणी नद्यांमार्फत भारताच्या मैदानी प्रदेशात पोहोचू शकते.
भूतानमध्ये पूर कुठं आणि कसा आला?
- 29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी भूतानमधील गासा जिल्ह्यातील लाया गेओग येथील लुंगोमधील शिंताफू त्शो सरोवरातून पाणी वाहू लागले.
- हे सरोवर वाकिला पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले असून, भूतानच्या 17 संभाव्य धोकादायक हिमनदी सरोवरांपैकी एक आहे.
- सरोवरातून सोडलेले पाणी मो छू नदीच्या पाणलोट क्षेत्रातून वेगाने पसरले.
- रात्री सुमारे सव्वा आठ वाजता पुराचे पाणी ताक्तसेमाखांग परिसरात पोहोचल्याचे वृत्त आहे.
- पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गासा त्साचू गरम पाण्याचा झरा उद्ध्वस्त झाला.








