Search
Close this search box.

Pradeep Purnekar : ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, आता त्यांना अटक कधी करणार? आदित्य ठाकेरेंचा सवाल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला तरी या प्रकरणातील मास्टरमाईंडला अद्याप अटक का करण्यात आली नाही? एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा का कामाला लावली आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. पोलिसांसमोर सगळे पुरावे असतानाही ते काहीच करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तातडीने कारवाई व्हावी यासाठी आदित्य ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, “ठाण्यात हत्या झाल्यानंतर सर्वत्र आक्रोश निर्माण झाला. राम पूर्णेकर हा त्याच्या वडिलांच्या हत्येवर न्याय मागण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेला असता पोलिसांनी रामलाच अटक केली. पोलीस आयुक्तांची आम्ही भेट घेतली आणि या हत्येसंबंधी माहिती घेतली. परंतु पोलीस काही प्रयत्न करत नाहीत. पूर्णेकर कुटुंबीयांनी जो व्हिडीओ दिला आहे त्यावर पोलीस काहीही कारवाई करत नाहीत. यामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सगळी सरकारी यंत्रणा कामाला का लावली आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच आम्ही न्याय मागत असताना ठाण्याच्या खासदारांची भाषा बघा, असं सांगत नरेश म्हस्के यांच्यावरही टीका केली. ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा झाला आहे. मग आता त्यांना अटक कधी करणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

संजय राऊतांची मुख्यमंत्र्यावर टीका 

ठाण्याची अवस्था ही बीडपेक्षाही वाईट करून टाकली आहे. ही राजकीय हत्या असून मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी घडवून आणली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्राने इतका दुर्बल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या आधी कधीही पाहिला नाही, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

स्वतः पोलीस आयुक्तांना माहिती आहे या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण आहे. मात्र पोलिसांची हात बांधले आहेत. पोलिसांना पुरावे शोधता येत नसतील तर पोलीस खातं बरखास्त करा, अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.

मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा 

प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी सातत्यानं पूर्णेकर कुटुंबीय आणि ठाकरे सेनेच्या निशाण्यावर असणाऱ्या मीनाक्षी शिंदेंनी शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. नेतृत्वाची बदनामी टाळण्यासाठी आपण निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदेंनी दिलं. आपला संबंध नसलेल्या काही प्रकरणांमध्ये नाव जोडून पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदेंनी आपल्या पत्रात केला. मीनाक्षी शिंदे यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें