पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीदरम्यान दोन विचित्र घटना पहिल्या दोन तासांमध्ये घडल्याचं दिसत आहे. आठ मतपेट्यांना सील नसल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. तर दुसरीकडे मतपेटीमध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यामधून थेट इशारा देण्यात आला आहे. नेमकं या चिठ्ठीत काय आहे आणि सकाळपासून पुण्यातील मतमोजणीदरम्यान काय झालं ते पाहूयात…
आठ मतपेट्यांना सील नाही
पुण्यामधील मतमोजणीदरम्यान काही पेट्यांना सील नसल्यावरून महाविकास आघाडीच्या मतमोजणी प्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. आठ मतपेट्यांना सील नसल्यामुळे प्रतिनिधींकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी यावरुन शाब्दिक चकमक झाली.
चिठ्ठीत काय लिहिलंय?
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतपेटीत एक चिठ्ठी सापडली आहे. “आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. 2004 पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर बघा…” असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी शिक्षक मतपेटीमध्ये सापडली. दोन नंबर टेबलवर ही चिठ्ठी सापडली आहे. निवडणूक अधिकाऱ्याला चिठ्ठी देण्यात आली आहे. किरण गोफणे यांनी याबाबतची माहिती निवडणूक अधिकाऱ्याला दिली आहे.
भाजपाचा टोला
ईव्हीएम नाही, मतचोरीचा आरोप नाही… मग आज विरोधक रडणार कशावर? असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला. “आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे निकाल जाहीर होतील. या जागांवर सध्या विरोधकांचे आमदार आहेत, तर तीन जागांवर भाजपाने उमेदवार दिले आहेत. मतदान मतपत्रिकेवर झालंय!” असं उपाध्ये यांनी म्हटलंय. “मग पराभव झाला तर खापर फोडणार कशावर, मतपत्रिकेवर, निवडणूक आयोगावर की स्वतःच्या अपयशावर? निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय आणि विरोधात गेला तर आरोपांची राळ हा दुटप्पीपणा आता बंद झाला पाहिजे! जनतेचा कौल स्वीकारण्याची हिंमत ठेवा; प्रत्येक पराभवासाठी नवं निमित्त शोधू नका!” असा सल्ला उपाध्ये यांनी दिला आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात कोणाविरुद्ध कोण?
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच अंतर्गत चुरस पाहायला मिळणार असून एकूण 30 उमेदवार पुण्यातून नशीब आजमावत आहेत. महायुतीमध्ये असलेल्या मतभेदांमुळे गाजलेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार बाजी मारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोणत्या पक्षातून कोण ही निवडणूक लढलं आहे ते पाहूयात…
* कौस्तुभ मुरलीधर गावडे – भारतीय जनता पार्टी (महायुतीचे अधिकृत उमेदवार)
* जयंत आसगावकर – काँग्रेस (महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार – विद्यमान आमदार)
* सचिन सानप – शिवसेना – (एकनाथ शिंदे गट पुरस्कृत उमेदवार)
* दत्तात्रय सावंत – अपक्ष (माजी आमदार / बंडखोर उमेदवार)
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये तिहेरी लढत
विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील पदवीधर मतदारसंघात एकूण 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून इथे बंडखोरी करुन महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोदीसुद्धा निडवणुकीच्या रिंगात आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार भाजपा उमेदवाराबरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूद्धही लढला आहे. या मतदारसंघातील तीन प्रमुख उमेदवार कोण –
* डॉ. स्मिता योगेश जाधव – भाजप (महायुती)
* हर्षदा देशमुख-जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष (महाविकास आघाडी)
* सुनील मोदी – शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (बंडखोर/स्वतंत्र)








