छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. (Chhatrapati Sambhajinagar) विहामांडवा येथे ही घटना घडली आहे. महिलेच्या उपचाराचा खर्च सासरच्यांनी करण्यास नकार दिला,माहेरच्यांनी खर्च करण्याची तयारी दर्शवूनही तिला रुग्णालयात दाखल केले नाही. केवळ उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा तिच्या पोटातल्या बाळासह करुण अंत झाला आहे. या प्रकरणी मृत गर्भवती महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे. (Preganat Women Death)
नेमकं घडलं काय? (Chhatrapati Sambhajinagar)
स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर नऊ महिन्यांची गर्भवती होती. सहा सप्टेंबर रोजी प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर तिच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झालं होतंआणि बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळली गेली होती. गर्भातील गुंतागुंत वाढत असल्याचे कळताच डॉक्टरांनी तातडीने सिझर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, उपचाराचा खर्च करण्यास सासरच्यांनी नकार दिला. महिलेच्या माहेरच्यांनी उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शवली. मात्र, तरीही तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. अखेर प्रकृती गंभीर झाल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच स्वातीने श्वास सोडला. तिच्या पोटातील 9 महिन्यांचे बाळही दगावले. सासरच्या मंडळींच्या आडमुठेपणामुळे 9 महिन्याच्या गर्भावातीचा हकनाक जीव गेला.
या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल निंबाळकर, सासू शारदा निंबाळकर आणि नणंद ऐश्वर्या (सर्व रा. विहामांडवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पैठणसह संपूर्ण संभाजीनगर जिल्हा सुन्न झाला आहे. या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेला सासरच्यांकडून नेमका काय त्रास होता? मानसिक शारीरिक छळ होत होता का? याविषयी पोलीस पुढील तपास करत आहेत.








