महाराष्ट्रात पेपरफुटीचे ग्रहण लागलं असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसह 3 परीक्षांसदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्य परीक्षेसह 3 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यातच या प्रकरणातील मुख्य आरोपीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्य आरोपी २०२६ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आयोगात कामाला होता. त्यामुळे आगामी परीक्षेचाही पेपरफुटीची भीती विद्यार्थ्यांमध्ये असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेसंदर्भात हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान दुसरीकडे राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 मधील मूल्यांकनाबाबतही अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाचे आक्षेप व्यक्त केला होता. त्यामुळे आयोगाने उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम आगामी परीक्षेच्या तारख्यांवर झाला आहे.
तसंच राज्यातील सध्याच्या विविध परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन यापूर्वीच केली आहे. ही समिती राज्यभरातील अनेक परीक्षार्थी आणि संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे. त्यासोबतच विविध उत्तम कार्यपद्धतींचा अभ्यास ही समिती करणार आहे. आदर्श परीक्षा पद्धतीबाबत समिती शिफारस देणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसंच काही लोकप्रतिनिधींनी 3 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे करत होते. यामुळेही आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने 3 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ सह स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा पुढे ढकलली आहे. गट-क संयुक्त पूर्वपरीक्षा 25 ऑक्टोबरऐवजी आता 3 जानेवारी 2027 ला राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२६ होणार आहे. सणासुदीचा कालावधी, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि हिवाळी अधिवेशन या सगळ्याचा विचार करून ही तारीख ठरवण्यात आली आहे.







