Search
Close this search box.

Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणे यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लातूर  शहरातील प्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे (Sanjeev Sonawane) यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्राचा मजकूर समोर आला आहे. इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, तसेच कोणताही तपास करू नये, असे नमूद केले आहे. पत्राच्या शेवटी लिहिलेल्या ‘I am a good fool’ या वाक्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Crime news)

संजीव सोनवणे यांनी आपल्या पत्रात, “माझ्या मृत्यूला कोणालाही कारण धरू नका. कसलाही तपास करू नका. माझ्या मृत्यूला कोणासही जबाबदार धरू नका. मी स्वेच्छेने आत्महत्या करत आहे,” अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. त्यानंतर त्यांनी ‘I am a good fool’ असे लिहून स्वाक्षरी केली आहे. या पत्रातील मजकूर समोर आल्यानंतर कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः ‘I am a good fool’ या वाक्याचा नेमका अर्थ काय, याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

I am a good fool हा शब्दप्रयोग कोणत्या संदर्भात वापरला आहे, यावर त्याचा अर्थ बदलू शकतो. काहीजण याचा अर्थ भोळा-भाबडा, सहज विश्वास ठेवणारा किंवा स्वतःला दोष देणारा असा लावत आहेत. मात्र, या एका वाक्यावरून कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातील मजकूर आणि त्यामागील परिस्थिती यांचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती, पत्राचा संदर्भ तसेच इतर उपलब्ध पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेने लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, सोनवणे यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लातूर शहर पोलिसांकडून सुरू आहे.

Sanjeev Sonawane Suicide news: नेमकं काय घडलं होतं?

संजीव सोनवणे (Sanjeev Sonawane Death) यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर लातूर शहरात एकच खळबळ उडाली होती. संजीव सोनवणे यांचे कुटुंबीय परदेशी गेले होते. त्यावेळी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. संजीव सोनावणे हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोठे नाव होते. त्यांनी परळी येथे संकल्प कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्दीचा प्रारंभ केला. त्यानंतर सुमारे तीन वर्षांनी, सन 2000 च्या आसपास लातूर येथे संकल्प कोचिंग क्लासेसची सुरुवात करण्यात आली. पुढे 2005 च्या सुमारास चंद्रभानू सोनवणे कॉलेजची स्थापना करण्यात आली. बार्शीजवळील उकडगाव येथे शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आले. तसेच तीन वर्षांपूर्वी खडकवासला येथेही शाळा आणि महाविद्यालय सुरु केले होते.

admin
Author: admin

और पढ़ें