कुणबी प्रमाणपत्राचं करण्यात आलेलं वाटप, कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून कुणबी जात प्रमाणपत्र वाटपासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन, प्रशासनाकडून कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी करण्यात आलेले प्रयत्न याबाबत जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांचं उपोषण संपेपर्यंत अंतरवाली सराटी येथे दारू विक्री बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमलेल्या न्या शिंदे समितीला 5 हजार 27 नोंदी आढळून आल्या आहेत. 18 हजार 276 अर्ज मंजूर करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले आहे. फक्त पॉईंट 0.1टक्के अर्ज प्रशासनाने नाकारले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
“आजपासून 10 ते 16 सप्टेंबर दरम्यान जात प्रमाणपत्र अडचणी सोडवण्यासाठी जालन्यात शिबीर घेण्यात येत आहे. जिल्ह्यात जिथे जिथे नोंदी आढळून आल्या आहेत त्या ग्रामपंचायतींवर नोंदी चिटकवल्या आहेत. नियमाप्रमाणे कुणबी जातीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे.अर्ज केल्यानंतर कूळ सिद्ध करता आलं पाहिजे. आता आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरात सर्व पुरावे घेऊन येणे गरजेचे आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
“आज बैलपोळा असल्यानं अर्ज घेऊन लोक शिबिरात आले नाही तरीही तहसिलमध्ये जात प्रमाणपत्रसाठी अर्ज करता येणार. गेल्या 3 वर्षात 35 हजार 981कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. जात पडताळणीकडे 1 हजार 664 अर्ज प्राप्त झाले यातील 1016 प्रकरणे वैध ठरली. 492 प्रकरणे जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे 133 प्रकरणात नातेसंबंध अथवा पुरावे सादर करता न आल्यावर निकाली काढण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.








