Search
Close this search box.

35 सेकंदात तिकीटं संपून वेटींग लिस्ट सुरु! रात्रभर रांगेत थांबूनही तिकीटाशिवाय परतले; आता गणपतीसाठी कोकणात गावी जायचं कसं? मोठा प्रश्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेने जादा गाड्या घोषित केल्या. मात्र या जादा गाड्या आणि नियमित गाड्यांमध्ये तिकीट बुकिंग करणं सर्वसामान्यांसाठी जवळपास अशक्य झालं आहे. या गाड्यांच्या बुकिंगसाठी वेबसाईटला भेट दिल्यास ‘रिग्रेट’ दाखवले जात असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांचा हिरमोड झाला आहे. गाड्यांची वेटींग लिस्ट काही मिनिटांत ‘फुल्ल’ झाल्यामुळे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ‘रिग्रेट’चा मेसेज दिसत आहे. नवीन सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेसचे आरक्षण अवघ्या 35 सेकंदांत वेटींग लिस्टवर पोहोचले. त्यामुळे आता गावाला जायचं कसं, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला असून आणखी गणपती स्पेशल गाड्या सोडण्याची मागणी जोर धरत आहे.

रात्रभर रांगेत उभे, मात्र रिकाम्या हाताने घरी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी एक्सप्रेसचे आरक्षण बुधवारी सकाळी खुले झाले होते. या गाडीच्या तिकिटासाठी अनेक चाकरमान्यांनी मंगळवारी रात्रीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेलसह अनेक स्थानकांत रांगा लावल्या होत्या. मात्र काही सेकंदांत बुकिंग फुल्ल झाले. त्यामुळे प्रत्येक स्थानकात जेमतेम दोन-चार प्रवाशांनाच तिकीट मिळाले. बाकी प्रवासी रिकाम्या हाताने घरी परतले. 11 सप्टेंबरच्या बुकिंगला सर्वाधिक मागणी होती.

बुकिंग करायचं कसं?

सणासुदीच्या धर्तीवरच मुंबई-सावंतवाडी रोड नियमित एक्स्प्रेसला मंजूरी दिली आहे. मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस रात्री 11.5o वाजता सुटणार असल्याने नोकरदारवर्गांसाठी ही वेळ सोयीची असल्याचं सांगितलं जात आहे.  रात्रीचा प्रवास सोयीचा असल्याने अनेकांनी गाडीसाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर अक्षरक्षः उड्या घेतल्या. यामुळे सकाळीच आरक्षण पूर्ण झाले. दरम्यान ही गाडी नियमित असल्याने अनेकांनी 11, 12 सप्टेंबर तारखांसाठीचे आरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तारखेच्या प्रवासासाठी ‘ट्रेन कॅन्सल्ड’ असा संदेश संकेतस्थळावर दिसला. विशेष म्हणजे दुपारनंतर ट्रेन कॅन्सल्ड ऐवजी सस्पेंडेड असा मेसेज झळकला. यामुळे आरक्षण कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला.

14 तासांहून अधिक प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या रोज धावणाऱ्या एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला असला, तरी हा प्रवास अत्यंत वेळखाऊ होणार आहे. मुंबईतून सावंतवाडीला जाणाऱ्या अन्य गाड्यांच्या तुलनेत या गाडीला सर्वाधिक वेळ लागणार आहे. ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. या गाडीला प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल 14 तास 15 मिनिटे लागणार आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें