भुलेश्वरचा राजा मंडळाची गणेश मूर्ती कोसळून दोन भाविकांचा शनिवारी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. गणेशोत्सवाआधीच उत्सवाला गालबोट लागल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती. या घटनेनंतर भुलेश्वरच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराबद्दल अनेक चर्चांना उत आला होता. मूर्तीकार अनिकेत देसाई हे गायब असल्याची माहिती समोर येत होती. मात्र आता मुंबई पोलिसांनी देसाई यांचा जबाब नोंदवला आहे.
मूर्तीकार अनिल देसाई यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला आहे. अनिकेत देसाई यांचा जबाबात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच 100 ते 150 मीटरवर मूर्तीच्या पाठीमागचे वेल्डिंग तुटले होते, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच 100 ते 150 मीटरवर मूर्तीच्या पाठीमागचे वेल्डिंग तुटले होते. त्यानंतर मूर्ती 150 मीटर अंतरावरुन पुन्हा कारखान्यात आणण्यात आली आणि वेल्डिंग पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यातून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नेली, असा जबाब अनिकेत देसाई यांनी पोलिसांना दिला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मूर्तीचं वेल्डिंग तुटल्यामुळं तोल गेल्याने मूर्ती कोसळली असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. एलटी मार्ग पोलिसांनी मूर्तीकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवला आहे. अनिकेत यांच्या जबाबाने आता पोलिस तपासाला वेग येणार आहे.
समोर आलेल्या माहितेनुसार, बाप्पाची मूर्ती बाहेर पडली तेव्हा मूर्तीच्या मागचा ब्लॉक आणि स्क्रू निघाला होता. त्यामुळं पुन्हा मूर्ती कारखान्यात आणण्यात आली होती. कारखान्यात वेल्डिंग करुन पुन्हा मूर्ती मार्गस्थ झाली होती. त्यामुळं आता या प्रकरणात नेमकी कोणाची चुकी होती आणि काय घडलं होतं? याचा शोध पोलिस घेत आहेत.








