पुढील 24 तासांसाठी मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये भारतीय हवामान विभागाने (IMD) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी तर, कुठं पावसाची रिपरिप सुरूच आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात वाढ. 8.12 टक्क्यांनी पाणी पातळीत वाढ झाल्याचंही वृत्त यादरम्यान समोर आलं आहे.
शहरातील पावसाचं प्रमाण पाहता महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा दिला आहे. काम असल्यासच घराबाहेर पडा, 1916 हा आपात्कालीन क्रमांकावर संपर्क साधा असं महापौर रितू तावडेंचं आवाहन. मुंबई शहरामध्ये सध्या असणारी परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना असो किंवा नुकतंच मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकानं गमावलेला जीव असो, प्रशासकीय कामांचा बोजवारा उडाल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सखल भागांमध्ये साचलं पाणी…
नालेसफाई झाली असतानामुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून दादर पूर्वेला पाणी साचल्याची घटना घडली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मॅनहोल उघडून तिथं पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थी आणि कर्मचारी याच पाण्यातून वाट काढत आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये हीच स्थिती असून, अंधेरी सबवे किंग्ज सर्कल इथंही हेच चित्र आहे. पावसानं जोर पकडताच मुंबईची पुन्हा तुंबई झाली असून पुढील काही तास चिंतेचे मानले जात आहेत.
मुंबईकरांचा प्रवास बोंबलला…
शहरात कोसळणाऱ्या पावसामुळं अनेक रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनवरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि सायन-पनवेल हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
हाय टाईडचा इशारा…
मुंबई आणि नवी मुंबई क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असून, दरम्यानच्या काळात समुद्रात उंच लाटा उसळण्याचा अर्थात हाय टाईडचा इशारा देण्यात आला आहे. पावसासोबतच समुद्रात येणाऱ्या या बेफाम भरतीच्या वेळी पाणी उपसण्याची यंत्रणा संथ होत असल्याने नागरिकांना किनारपट्टी भागापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईत भरती ओहोटीच्या वेळा
- पहिली ओहोटी (Low Tide): सकाळी 7.21 वाजता
- दुसरी भरती (High Tide): दुपारी 2.12 वाजता (उंची: 4.39 मीटर)
- दुसरी ओहोटी (Low Tide): रात्री 8.27 वाजता (उंची: 1.61 मीटर )
3 जुलै रोजी दुपारी येणारी ही भरती आणि मुसळधार पाऊस एकाच वेळी आल्यास मुंबईतील सखल भागांतून पाण्याचा निचरा होण्यास आव्हानं उभी राहू शकतात. त्यामुळं नागरिकांसह प्रशासनसुद्धा सध्या घडामोडींवर लक्ष ठेवत आहे.








