Search
Close this search box.

पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Vidhanparishad) नाराजीचं सर्वाधिक नाट्य रंगलं ते पुण्यात. पुणे विधानपरिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, पक्ष कार्यालयात बसूनच नुकतेच भाजपातून राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केलेले विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनिल टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. त्यातच, महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली असली तरीही भाजपच्या प्रदीप कंद यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, पुण्यातील (Pune) अंतिम उमेदवारीसाठी 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राष्ट्रवादीतील या नाराजी नाट्यावर आता जय पवार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलंय.

पुणे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर त्यांच्याच पक्षाच्या सुनिल टिंगरे यांनी देखील डमी अर्ज दाखल केलाय. विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर टिंगरे त्यांचा अर्ज मागे घेतील अस सांगण्यात आल आहे. तर भाजपचे प्रदिप कंद यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, महायुतीमधील बंडखोरी रोखण्यासाठी कंद यांना अर्ज मागे घ्यायला लावण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर असणार आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून याआधीच शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी देखील अर्ज दाखल केलाय, त्यांचा डमी अर्ज म्हणून तुषार कामटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली असून पुणे विधानपरिषदेसाठी अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा असल्याने माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला आहे. तर त्याला डमी अर्ज म्हणून पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचा अर्ज आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पुण्यातील राष्ट्रवादीमधील दोन अर्जावर जय पवार यांनी भाष्य केलं आहे.

महायुती उमेदवारी दिली असून वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे, कार्यकर्ते म्हणून आम्ही आहोत. वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे, तो आम्ही मान्य केला. मी सगळ्यांसोबत असतो, कोणीही लोक नाराज असतील तर त्यांना भेटून नाराजी दूर करू, असे जय पवार यांनी पुण्यातील नाराजीनाट्यवर बोलताना म्हटले. आमची सगळ्यांची इच्छा आहे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असेही जय पवार यांनी म्हटले. तर, दिलीप वळसे पाटील यांनीही यावर भाष्य केलंय.

विक्रम काकडे हेच आमचे उमेदवार – वळसे पाटील

पुणे विधानपरिषद जागेसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विक्रम काकडे यांची उमेदवारी सर्व नेत्यांनी ठरवली आहे, एकत्रितपणाने चर्चा करुन त्यांना ही उमेदवारी दिली आहे. आम्ही महायुती म्हणून  एकत्रित आहोत, चांगल्या मताने जिंकू, निवडणुकीत मुख्य उमेदवार आणि डमी एक अशी उमेदवारी असते. विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांचे दोन फॉर्म भरले आहेत, काकडे पिता पुत्राने पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे, अधिकृत उमेदवार काकडे असतील, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

महायुती म्हणून उमेदवाराला मदत करू – मोहोळ

महायुती म्हणून आम्ही एकत्र लढत आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तो त्यांचा निर्णय आहे, असे भाजप नेते तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. संजय काकडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. महायुती म्हणून उमेदवाराला आम्ही मदत करू, असेही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले.

admin
Author: admin

और पढ़ें