अभिनेता रितेश देशमुखची मध्यवर्ती भूमिका असणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा सामना सेन्सॉर बोर्डाशी झाला असून, ही प्रमाणपत्राची प्रक्रियासुद्धा पूर्ण झाली आहे. अधिकृत माहितीनुसार हा संपूर्ण चित्रपट 3 तास 15 मिनिचं आणि 5 सेकंद इतक्या वेळेचा असून, त्यामध्ये सेन्सॉर बोर्डानं काही किरकोळ बदल सुचवत चित्रपटाला U/A 16+ प्रमाणपत्र देऊ केलं आहे. दरम्यान या चित्रपटाच्या तिकीट विक्रीनं सर्वांतत लक्ष वेधलं आहे.
चित्रपटाच्या तिकीटविक्रीला सुरुवात?
रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, सचिन खेडेकर, भाग्यश्री आणि इतरही अनेक बड्या कलाकारांच्या भूमिका असणारा हा चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी 27 एप्रिलपासून या चित्रपटाच्या Advance बुकिंगला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या 11 हजारांहून अधिक तिकीटी विकल्या गेल्या. मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या शहरांतून चित्रपटाच्या तिकीटांचं बुकिंग करण्यात आलं अशी प्राथमिक माहिती आहे. तेव्हा आता रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा असा हा चित्रपट त्याला कितपत यश मिळवून देतो याकडेच सिनेरसिकांचं आणि संपूर्ण कलाविश्वाचं लक्ष लागलं आहे.
सेन्सॉर बोर्डानं कोणते बदल सुचवले?
‘राजा शिवाजी’ चित्रपटासाठीची सेन्सॉर प्रक्रिया 24 एप्रिलला पूर्ण झाल्याचं वृत्त बॉलिवूड हंगामानं प्रसिद्ध केलं. बोर्डानं चित्रपट निर्मात्यांना Disclaimer बदलण्यास सांगत एक व्हॉईस ओवर जोडण्यास सांगितलं. याशिवाय ‘राजा शिवाजी’ हे नाव निवडण्यासाठीचं कारणसुद्धा निर्मात्यांना स्पष्ट करावं लागलं. याव्यतिरिक्त हा चित्रपट ऐतिहासिक संदर्भांवर आधारित असल्यामुळं त्या संदर्भांना अनुसरून असणारे पुरावे, दस्तऐवजसुद्धा बोर्डानं मागत चित्रपटातील संवाद आणि गाण्यांशी साधर्म्य असणारी संहितासुद्धा मागवली.
चित्रपटात दाखवण्यात आलेल्या मुख्य घटनांसह तारखा जोडणं महत्त्वाचं असल्याचं चित्रपटाच्या टीमला सुचवण्यात आलं. शिवाय ऐतिहासिक घटनांचा उल्लेख असणारी एक फीतसुद्धा / Text Slate जोडावी असं स्पष्ट केलं.
लहान मुलाच्या दृश्यावर कात्री…
सेन्सॉर बोर्डाच्या निरीक्षणानुसार या चित्रपटातील दोन दृश्य वगळण्यास सांगण्यात आली आहे. अर्थात त्या दृश्यांवर कात्री लागली आहे. यापैकी एका दृश्यात लहान मुलाला गंभीर इजा पोहोचवली जात असल्याचं दृश्य वगळून त्याऐवजी पर्यायी साहसदृश्य जोडण्यास सांगण्यात आलं आहे. तर, ज्या दृश्यांमध्ये आवाज नाही, तिथं आवाज जोडण्यासही सेन्सॉरनं सांगितलं आहे.








