मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील (Goregaon Nesco Centre Drugs case) लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव (Goregaon Crime) पूर्वेकडील नेस्को संकुलात ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेस्को, गोरेगाव येथील पार्टीत ड्रग्सचा उघडपणे वापर करण्यात आला असून प्राथमिक माहितीनुसार या कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थी हे नशेत असल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यंत्रणांची झोप उडाली असून या प्रकरणाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
दरम्यान, या पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाची परवानगी होती की नव्हती? हा तपास सध्या सुरू आहे. वनराई पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा अधिक वेगाने तपास सुरु आहे. तर या तपासातून आणखीन अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
Goregaon Crime: नेस्कोसारख्या हाय-प्रोफाइल ठिकाणी हे ड्रग्स पोहोचलेच कसे? दोन आरोपी अटकेत
दुसरीकडे, गोरेगाव नेस्को सेंटर पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेले दोन आरोपी आनंद पटेल आणि प्रतीक पांडे हे दोघे मित्र असल्याची माहिती आहे. तसेच हे दोघे कल्याणमध्ये राहायला असल्याची माहिती आहे. आनंद पटेल हा ड्रग्स सप्लाय करतो, तर प्रतीक पांडे यांनी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पार्टी करण्यासाठी आनंद पटेलकडून ड्रग्स विकत घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता आनंद पटेल याचं म्हणणं आहे कि मी ड्रग्स आशिष नावाच्या व्यक्तीकडून घेतलं होतं. दरम्यान, आनंद पटेल आणि त्याच्या वडिलांवर 19 गुन्हे दाखल असल्याचीही माहिती आहे.
Goregaon Crime: सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह, मोठ्या रॅकेटचा संशय
दरम्यान, या प्रकरणाचा वेगाने पोलीस तपास करत असताना नेस्कोसारख्या हाय-प्रोफाइल ठिकाणी हे ड्रग्स पोहोचलेच कसे? हा मोठा सवाल आता या निमित्याने विचारला जातोय. दुसरीकडे सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असताना परवानग्या कशा दिल्या? या मुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर देखील गंभीर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढणार असल्याची शक्यता आहे.








