समृद्धी महामार्गावर अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) मालिका सुरूच असून, काल सायंकाळी बुलढाण्याच्या (Buldhana) मेहकरजवळ (Mehkar) एक भीषण तिहेरी अपघात घडला. पहिल्या अपघातानंतर मदतीसाठी धावलेल्या समृद्धी महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनाच पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. या विचित्र अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून 5 जण किरकोळ जखमी आहेत.
Samruddhi Mahamarg Accident: नेक्सॉन कारच्या धडकेने अपघाताची सुरुवात
मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेल क्रमांक 293 जवळ हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एका नेक्सॉन कारने आपल्या समोरील अज्ञात वाहनाला जोराची धडक दिली. या पहिल्या धडकेत नेक्सॉन चालक शशांक खेरणार हे गंभीर जखमी झाले. घटनेची भीषणता पाहून महामार्गावरील सुरक्षा रक्षक आणि मदत पथक तातडीने तिथे पोहोचले.
Samruddhi Mahamarg Accident: मदतकार्य सुरू असतानाच ‘औरा’ कारने दिली धडक
अपघातातील जखमींना बाहेर काढण्याचे आणि मदतकार्य करण्याचे काम सुरू असतानाच मागून येणाऱ्या एका भरधाव ‘औरा’ कारने तेथे उभ्या असलेल्या ‘इनोव्हा’ कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, इनोव्हा कार पुढे सरकून आधीच अपघातग्रस्त झालेल्या नेक्सॉन कारवर जाऊन आदळली.
या दुसऱ्या धडकेत मदतीसाठी थांबलेले ट्रक चालक मोईजोद्दीन शेख हे गंभीर जखमी झाले. एमएसएफचे जवान आकाश मोहाडे, संतोष सोनुने, सचिन आंधळे आणि फायरचे परमेश्वर शिंदे यांना किरकोळ दुखापत झाली. याशिवाय औरा कारमधील अमित बोंडे आणि तेजस वाघोरे हे प्रवासी देखील जखमी झाले आहेत. मात्र, औरा कारचा चालक अक्षय हा अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे.
Samruddhi Mahamarg Accident: जखमींवर उपचार आणि वाहतूक सुरळीत
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सर्व 7 जखमींना रुग्णवाहिकेद्वारे मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने गंभीर जखमींपैकी एकाला जालना तर दुसऱ्याला मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. फरार चालकाचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.









