Search
Close this search box.

Shivsena : प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरुन आदित्य ठाकरेंवर नाराजी, ठाकरेंचे आमदार-खासदार अस्वस्थ; शिंदेंच्या मंत्र्याचा मोठा दावा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू होतील अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी हा दावा जरी फेटळला असला तरी शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यांनी मात्र मोठा दावा केला आहे. ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, मात्र त्यांना चांगली वागणूक मिळत नाही असं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. ते खासदार कधी ना कधी आमच्याकडे येतीलच असा दावा त्यांनी केला. तसेच, या आधी प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी दिल्यामुळे ठाकरेंचे खासदार आदित्य ठाकरेंवर नाराज होते असा दावाही त्यांनी केला.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, “ठाकरे गटाचे खासदारच नव्हे तर आमदारही अस्वस्थ आहेत. आमच्या तेव्हा काही तक्रारी होत्या, त्याच तक्रारी आज त्यांच्याकडील आमदार-खासदारांच्या आहेत. आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही, आम्हाला कोणी विचारत नाही, लक्ष देत नाही हे दुःख आमच्याकडे ते व्यक्त करतात. आमचे मित्रच आहेत ते सगळे. आता मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतील तेव्हा पुढचे पाऊल उचलले जाईल.”

ठाकरेंना आश्चर्य वाटेल असे लोक येतील

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याचा दावा प्रतापराव जाधव यांनी फेटाळला. अशी कोणतीही बैठक झाली नाही, परंतु ठाकरेंचे खासदार कधी ना कधी आमच्याकडे येतीलच असा दावा त्यांनी केला. तसेच दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी ऑपरेशन टायगरवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही ते म्हणाले.

प्रतापराव जाधव म्हणाले की, “आमचे मित्र आहेत दुःखी असतात. आम्ही त्यांना सांगतो, फार सहन करू नका. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुमचं स्वागत आहे. कोण पाऊल पुढे टाकणार याची प्रत्येकजण वाट पाहतोय. हे कधी ना कधी होणार आहेच. पण उद्धव साहेबांना आश्चर्य वाटेल असे लोक आमच्याकडे येतील.”

ऑपरेशन टायगरचा दावा फेटाळला

ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंना भेटल्याची बातमी पसरल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. बुधवारी ठाण्यातील व्होल्टास कंपनीत एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या सहा खासदारांची बैठक झाल्याची चर्चा होती. मात्र इतरवेळी एकमेकांचे नेते कशाप्रकारे आपल्या संपर्कात आहेत हे सांगण्यासाठी ज्याप्रकारे चढाओढ सुरु असते, त्याउलट आजचं चित्र होतं. ऑपरेशन टायगरचं वृत्त फेटाळण्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते सर्व ताकदीनिशी मैदानात उतरले. स्वत: एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंनीही हे वृत्त फेटाळलं.

ठाकरेंच्या सहा खासदारांनी बुधवारी शिंदेंची ठाण्यात भेट घेतल्याचं सांगितलं जातं होतं. या बैठकीला 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित होते असंही सांगितलं गेलं. मात्र दोन्ही शिवसेना हे वृत्त खोटं असल्याचं छातीठोकपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर निव्वळ अफवा की राजकीय चकवा अशी चर्चा अशी चर्चा सुरु आहे.

admin
Author: admin

और पढ़ें