नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातचे अनेक कारनामे बाहेर येत येताना पहायला मिळत आहेत. त्याच्या कार्यालयासह ‘तृप्तबाला’ बंगल्यातून असंख्य आधार कार्ड तसेच पॅन कार्ड पथकाने जप्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं पॅन कार्ड आणि आधार कार्ड पाहून पोलिसांनाही धक्काच बसला. खरातने या माध्यमातून आर्थिक व्यवहाराचे मोठे जाळे उभे केले होते. बनावट अकाउंट नंबर तसेच पतसंस्थांमध्ये शेकडो खात्यांतर स्वतःला नॉमिनी लावून खरातने करामती केल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे अनेक खात्यांना खरातचाच मोबाइल लिंक आहे.
लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास करताना समोर आली आर्थिक माहिती
भोंदू खरातने पोलिस कोठडीत दिलेल्या माहितीनंतर पथकाने झडती घेतली. खरात या आधार, पॅन कार्डचा वापर बनावट बँक खाते उघडण्यासाठी करीत असे. प्राथमिक तपासात 131 बनावट खाती पतसंस्थांमध्ये आढळून आली असली तरी आहिल्यानगर, नाशिक तसेच पुणे जिल्ह्यात अजून काही बनावट खाती खरातने उघडल्याचा संशय आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात लैंगिक शोषण करण्याचा जो दहावा गुन्हा खरातवर दाखल झाला त्यात पीडित महिलेने पोलिसांना दिलेला जबाबात धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतरच खरातच्या बनावट खात्याचे बिंग फुटले अन् तपासणीत त्याच्या घरातून तसेच कार्यालयातून असंख्य आधार, पॅन कार्ड ताब्यात घेण्यात आले.
प्रत्येक भक्ताकडून आधार, पॅन कार्ड घ्यायचा अन्…
भोंदू अशोक खरात भविष्य पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताकडून त्याचे आधार कार्ड तसेच पॅन कार्डच्या झेरॉक्स प्रती घेत असे. याद्वारे तो भक्ताचा कायमचा रहिवास जाणून घेत असे. नंतर या भक्ताला भेटण्यासाठी पुढची काही दिवसांची तारीख देऊन मधल्या दिवसात भोंदू खरात आपल्याकडे आलेल्या भक्ताची इत्थंभूत माहिती आपल्या पंटरांमार्फत गोळा करीत असे. यात आपल्याकडे आलेला भक्त कोणत्या समस्येने त्रस्त आहे, त्याच्या शेजारी कोणते मंदिर किंवा अन्य ठिकाण आहे याची माहिती खरात आधीच गोळा करून घेत असत. नंतर खरात या लोकांच्या आधार कार्डचा वापर बँक किंवा आर्थिक व्यवहारांसाठी करीत असल्याचे समोर आलं आहे.
मुलीची होणार चौकशी? तिच्या नावावर 100 कोटी?
दरम्यान, दुसरीकडे खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिची आज एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तृप्तबाला खरातच्या नावावर जवळपास 100 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे. कल्पना खरातची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरु आहे. कल्पनाने राहता न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज 4 एप्रिलला दाखल केला आहे. अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जावर 10 एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.









