अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना, याचा परिणाम आता अनेक देशांची अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांवररही होत आहे. युद्धामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जर स्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या काही दिवसात साबणापासून ते सोडा आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलासह दैनंदिन वापरातील वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील होईल. जलद-विक्री होणाऱ्या ग्राहक वस्तूंच्या (FMCG) कंपन्या आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीपासून पुन्हा एकदा किमती वाढवण्याची तयारी करत आहेत.
नुवामाचा अहवाल आला हाती
नुवामा इंस्टीट्यूशनल इक्विटीजच्या एका रिपोर्टनुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. यामुळे किंमती स्थिर ठेवण्याचं मोठं आव्हान कंपन्यांकडे पुढे असून, यासाठी त्यांना फार परिश्रम करावे लागत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टमधून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, जर कच्च्या तेलाच्या किंमतीमधील महागाईचा कल असाच राहिला तर आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत किमतींमध्ये किमान 3 ते 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
मात्र आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीत सध्या असणारा साठा मर्यादित राहण्याची अपेक्षा असली, तरी हा साठा जसजसा संपुष्टात येईल, तसतसे उद्योगातील बदलांसाठी तयारी सुरू झाली आहे. ‘नुवामा’च्या (Nuvama) एका अहवालात नमूद केलं आहे की, “आमच्या मते, कंपन्या साधारणपणे कच्चा माल आणि तयार मालाचा 30 ते 45 दिवसांचा साठा राखून ठेवतात. त्यामुळे, आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत किंमतवाढ होण्याची शक्यता आहे”.
कंपन्यांसमोर फक्त दर वाढवण्याचा पर्याय
तुमच्या माहितीसाठी, जवळपास प्रत्येक FMCG कंपनी आपले प्रोडक्ट्स (साबण, बिस्किट, शॅम्पू) यांचं पॅकेजिंग प्लास्टिकने करतं, जे तेलाच्या सहाय्याने तयार होतं. आता पॅकेजिंगला जास्त खर्च होणार आहे. यामुळे कंपन्यादेखील आपली उत्पादनं अधिक किंमतीत विकतील.
याशिवाय, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक आणि दळणवळणाशी संबंधित खर्चही वाढत आहेत. कंटेनरांच्या भाड्यापासून ते जहाजांच्या विम्यापर्यंत सर्व काही महाग झालं आहे. भारत केवळ कच्च्या तेलाचाच नव्हे, तर खाद्यतेलाचाही मोठा हिस्सा इतर देशांकडून सागरी मार्गाने आयात करतो. जर पुरवठा साखळीत व्यत्यय आला, तर स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीही आपोआप वाढतील.









