राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिकच्या खरात प्रकरणात आता SIT कडून खरात याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीने अशोक खरातच्या मुलाला तपास यंत्रांनी ताब्यात घेतलं आहे. कर्मयोगी नगर येथील खरातच्या तृप्तबाला या बंगल्याच्या ठिकाणी SIT पथकातील ३ महिला आणि १ पुरुष अधिकारी यांनी बंगल्याच्या गेट ठोठावला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तपास यंत्रणामधील अधिकारी यांनी शेजारी असलेल्या बंगल्याच्या कंपाऊडवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश केला आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मुलाला चौकशीसाठी आणलं
खरातच्या मुलाला महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे अधिक चौकशीसाठी आणण्यात आलं आहे अशोक खरात याची गेल्या १३ दिवसापासून SIT कडून कसून चौकशी सुरू आहे. त्यातच आता त्याच्या मुलाला देखील SITच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे एसआयटीच्या चौकशीमध्ये आता काय समोर येतं? कोणत्या दिशेने SITचा तपास हा सुरू आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू
भोंदू कॅप्टन अशोक खरात याच्या गुन्ह्यांची चौकशी सुरू असतानाच या प्रकरणाची एक वेगळी बाजू समोर आली आहे. ऐशोआरामी जीवन जगणारी त्याची पत्नी कल्पना (पूर्वाश्रमीची सुनीता) खरात हिचे माहेर मात्र सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात आजही हलाखीच्या परिस्थितीत आहे.
कल्पना खरात फरार
फसवणुकीच्या एका गुन्ह्यात कल्पना खरात हिचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. तिच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांचे पथक नाशिकमधील कर्मयोगीनगर परिसरातील ‘तृप्तबाला’ बंगल्यावरही पोहोचले होते. मात्र त्याआधीच ती फरार झाली, अशी माहिती मिळत आहे.
भाऊ आणि वडिलांचं निधन
कल्पना खरात हिचे माहेर पाडळी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबावर अलीकडच्या काळात दु:खांचे डोंगर कोसळले. कल्पनाच्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. पाठोपाठ वडिलांचेही आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे घरात वृद्ध आई, भाऊजयी आणि लहान भाचा असेच कुटुंब उरले आहे.









