घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केवळ ओटीपी (OTP) प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
गॅस 96 तासांच्या आत घरपोहोच
बैठकीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा केवळ ओटीपी प्रणालीद्वारेच करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना तेल कंपन्या व वितरकांना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर “गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपीद्वारेच 96 तासांच्या आत घरपोहोच करण्यात येईल” असा आशय दर्शविणारे फलक लावावेत, असे निर्देशही देण्यात आले.
गॅस एजन्सीसमोर गर्दी करू नये
जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर “गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपीद्वारेच 96 तासांच्या आत घरपोहोच करण्यात येईल, तरी गॅस एजन्सीसमोर गर्दी करू नये” असा संदेश (SMS) पाठवावा, असेही सांगण्यात आले. याशिवाय, ग्राहकांनी घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत घरपोहोच वितरण करणे बंधनकारक राहील, असे निर्देश गॅस वितरकांना देण्यात आले आहेत.
कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश
नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलिस प्रशासनालाही देण्यात आले आहेत.
पोलिसांनाही विशेष आदेश
पुणे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण सुरळीत आणि सुरक्षित पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलिस विभागाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गॅस सिलिंडर वितरणावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी लक्ष ठेवावे. तसेच गॅस एजन्सी आणि गोदामांवर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी संबंधित पोलिस स्टेशनने नियमित पाहणी करावी, असं जिल्हाधिकारी कार्यालायने सांगितलं आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडर वितरणासाठी पोलिस मदत मागितल्यास नियमानुसार मदत पुरवावी. त्याचप्रमाणे वितरणात अडथळा आणणे किंवा हस्तक्षेप झाल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असंही जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटलं आहे.
पुणेकरांना मोठा दिलासा
पुण्यामध्ये व्यवसायिक गॅसच्या पुरवठ्याला फटका बसल्याने अनेक हॉटेल आणि खानावळी बंद झाल्या आहेत. त्यामुळेच पुणेकरांना या गॅस टंचाईबद्दल चिंता वाटत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नव्या आदेशांमुळे पुणेकरांची सध्याच्या गॅस टंचाईच्या टेन्शनमधून सुटका होणार आहे.









