सोशल मीडियावरील आपल्या विनोदी शैलीने आणि अभिनयाने लाखोंची मने जिंकणारा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपे याचे आज मंगळवारी 10 मार्च रोजी सकाळी दुःखद निधन झाले. छत्रपती संभाजीनगरमधील बालाजी नगर येथील राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
इन्स्टाग्रामवर ‘कोण अरुण तुपे’ (Kon Arun Tupe) या नावाने त्याचे अधिकृत अकाऊंट असून, त्याचे 179K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आपल्या हटके स्टाईलने आणि मजेशीर रील्समुळे तो तरुण वर्गात प्रचंड लोकप्रिय होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांनी आणि सोशल मीडियावरील इतर सेलिब्रिटींनी हळहळ व्यक्त केली आहे.
नेमकी घटना काय?
अरुण त्याच्या बालाजी नगर येथे राहत्या घरात अत्यवस्थेत आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. अरुणचा मृतदेह घाटी इथल्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल, असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप ते हाती आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अरुण त्याच्या निवासस्थानी मृतावस्थेत सापडला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे तुपे कुटुंबावर आणि त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका उमद्या कलाकाराचा असा अचानक निरोप घेणे, ही डिजिटल विश्वासाठी मोठी हानी मानली जात आहे. चाहत्यांकडून त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
अरुणने सोशल मीडियावर 21 तासांपूर्वीच रील अपलोड केला होता. जो आता शेवटचा रील ठरला आहे. एवढंच नव्हे तर मृत्यूपूर्वी त्या या रील्सखाली येणाऱ्या कमेंट्सना उत्तर देखील दिलं आहे. त्यामुळे अरुणसोबत असा काही प्रकार घडेल असं कुणाला वाटलंही नव्हतं. याच्या या शेवटच्या रीलवर कमेंट करुन चाहते शोक व्यक्त केला आहे. अरुणला अपस्मारचा (फिट) त्रास होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. परंतु त्याच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. अशी देखील चर्चा आहे की, त्याचा हृदयविकाराचा झटका आला पण शवविच्छेदनाचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.









