भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी20 वर्ल्ड कप 2026 चा (T20 World Cup 2026) फायनल सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) 8 मार्च रोजी न्यूझीलंड संघाला तब्बल 96 धावांनी धूळ चारत विजय मिळवला. यासह टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली. यापूर्वी 2024 चा टी 20 वर्ल्ड कप सुद्धा भारताने जिंकला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा पाहायला मिळतोय. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या सामन्यात न्यूझीलंडला 19 व्या ओव्हरला 159 धावांवर ऑलआउट केलं.
वर्ल्ड कप फायनलमधील सर्वात मोठा स्कोअर :
टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्याचा टॉस हरल्याने भारताला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. यावेळी सूर्यकुमार यादव वगळता टीम इंडियाच्या सर्वच फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून स्कोअर बोर्डवर आतापर्यंतचा वर्ल्ड कप फायनलमधील सर्वात मोठा स्कोअर उभा केला. यात टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माला (52) या सामन्यात त्याचा फॉर्म गवसला. तर संजू सॅमसनने (89) सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. तर ईशान किशनने 54 धावा केला. हार्दिक पंड्याने 18 तर शिवम दुबेने 26 धावा केल्या. टीम इंडियाने अत्यंत महत्वाच्या सामन्यात 5 विकेट गमावून 255 धावा केल्या.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी फोडला घाम :
न्यूझीलंडला विजयासाठी 256 धावांचं आव्हान मिळालं होतं. न्यूझीलंडचे फलंदाज हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले खरे मात्र त्यांना टीम इंडियाचा गोलंदाजांनी अक्षरशः घाम फोडला आणि एका मागोमाग एक पॅव्हेलियनमध्ये धाडलं. टीम इंडियाकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजी जसप्रीत बुमराहने केली, त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा देऊन तब्बल 4 विकेट घेतल्या. अक्षर पटेलने 3 विकेट्स तर हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताची प्लेईंग 11 :
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडची प्लेईंग 11 :
टिम सेफर्ट (विकेटकिपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी









