उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी 12 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Ajit Pawar Funeral Baramati) करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. त्यानंतर आज अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या.
काल अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाल्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या. यावेळी शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित होते. शरद पवारांनी अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवारसह अनेक नातवाईक आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश- (Ajit Pawar Plane Crash)
राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.
अपघात कसा झाला? सरकारच्या प्राथमिक अहवालात काय? (Ajit Pawar Death Baramati)
सदर विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालानूसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे. त्यानंतर विमानातील पायलटने सांगितलं की ते रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत आहेत. पण त्यांना रनवे दिसत नाहीय. नंतर पायलटने पुन्हा एटीसीला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो. त्यानंतर 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, असं एटीसीवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.








