‘कामाचा माणूस’ अशी ओळख असणाऱ्या आणि सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या अजित पवार यांचा बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती मृत्यू झाला. मुंबईहून (Baramati) बारामतीच्या दिशेनं त्यांचं विमान निघालं असता हा अपघात झाला, ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील साऱ्यांचाच मृत्यू ओढावला. इथं संपूर्ण राज्य हक्काचा माणूस गेल्याच्या दु:खात कोलमडली होती, तर तिथं पवार कुटुंबासाठी हा एक मोठा धक्का होता. खरं आव्हान होतं ते म्हणजे अजित पवार यांच्या आईला ही बातमी सांगणं.
सारं कुटुंब विरोधात गेलं तरी आई कायम माझ्या बाजूनं असेल असं म्हणणारे आणि आईवर जीवापाड प्रेम करणारे अजित पवार शक्य होईल तेव्हातेव्हा आपल्या कामातून वेळ काढत तिची भेट घेत असत. निधनाच्या या वृत्तानंतर त्यांच्या फार्महाऊसवरून पोटात खड्डा करणारी एक बातमी समोर आली. अजित पवारांचा विमान अपघात झाला आणि पुढील वृत्त समोर येऊ लागली तेव्हा त्यांची आई शेतावरील घरात होती. नेहमीप्रमाणे तिथं त्या बातम्या पाहत होत्या. टीव्हीवर अजित पवारांच्या अपघाताची बातमी त्यांनीही पाहिली. व्यवस्थापक संपत धायगुडे आणि तेथील आणखी काही व्यक्तींच्या माहितीनुसार आशाताई पवार यांना नाश्ता देण्याची तयारी केली जात होती.
सकाळी साडेआठच्या सुमारास समोर आलेल्या बातम्यांनंतर, ‘दादांचा अपघात झालाय का?’ असं विचारलं. आपल्या लेकराचा खरचटलं असेल असंच त्या आईलाही वाटलं. इथं आईचं मन स्वत:चीच समजू काढत होतं आणि तिथं बारामतीत अजित पवारांना रुग्णालयात आणण्यात आलं. टीव्हीवर पुढच्या घडामोडी अतिशय वेगानं येऊ लागल्या. मात्र आईसा हे धक्कादायक वृत्त कळू नये म्हणून बंगल्यावरच्या टीव्हीचे केबल तोडण्यात आली. आईला, टीव्ही बंद पडलाय, असं खोटं सांगावं लागलं. मोबाईलसुद्धा फ्लाईट मोडवर टाकण्यात आला.
शेवटी आईचं मन ते… लेकराच्या काळजीनं काय केलं?
आईंच्या मनात कालवाकालव सुरू झालेली, कारण शेवटी ते आईचं काळीज! ‘दादांना भेटून येऊ…’ असं म्हणत त्या बंगल्याबाहेर आल्या. चालकानं गाडी बंद पडल्याचा बहाणा केला पण, तरीही त्या थांबल्या नाहीत. अखेर नाईलाजानं त्यांना बारामतीतील बंगल्यावर आणण्यात आलं आणि तिथंच आपल्या लेकराच्या निधनातं वृत्त त्या मातेला सांगण्यात आलं. हा क्षण शब्दांत व्यक्त करता येणारा नसून, या आईवर आभाळच कोसळलं होतं; लेकराचा मृत्यू त्यांनी डोळ्यांदेखत पाहिला होता. याहून वाईट ते आणखी काय…
अशी होती आईसोबतची अखेरची भेट…
चार दिवसांपूर्वीच अजित पवार फार्महाऊसवर आईच्या भेटीसाठी आले होते. शनिवार 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी ते आईच्या भेटीसाठी आले होते. आईसोबत पाऊण तास गप्पा मारल्या, शेतातील कामगारांशी संवाद साधत त्यांना शेतीसंबंधी सूचना केल्या, त्यांची विचारपूस केली आणि इथून ते पुढच्या कार्यक्रमांसाठी रवाना झाले… ते गेले खरे मात्र परत कधीच न येण्यासाठी. फार्महाऊसवर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यानं ‘आमचा मालक गेला…’ असं म्हणत हळहळ व्यक्त केली आणि अजित पवारांच्या जाण्याची झळ कुठवर पोहोचलीये हे पुन्हा लक्षात आलं.









