पुण्यात 17वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचं अपहरण करुन नंतर त्याची हत्या करण्यात आली. मुलीच्या सोशल मीडियाचा आधार घेत त्यांनी आधी तरुणाला कात्रज घाटात बोलावलं आणि नंतर दगडानं ठेचून अन् कोयत्याने वार करून ठार केलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली असून, दोन अल्पवयीन ताब्यात आहेत. 29 डिसेंबर रोजी ही हत्या करण्यात आली होती.
अमनसिंग सुरेद्रसिंह गच्चड (17) असं पीडित मुलाचं नाव आहे. त्याने 29 डिसेंबरच्या सकाळी घर सोडलं होतं. दोन दिवसानंतरही मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, निरीक्षक संपतराव राऊत आणि सहाय्यक निरीक्षक महेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव येथून प्रथमेश चिंदू अधळ (19) आणि नागेश बालाजी ढाबाले (19) रा. शिवणे यांना अटक केली आणि 16 आणि 17 वर्षांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
आरोपींनी इन्स्टाग्रामवरती एका मुलीच्या माध्यमातून आरोपींनी मृत मुलाला कात्रज परिसरात बोलावून घेतलं. त्यानंतर त्याला खेड शिवापूर येथे नेऊन त्याचा दगड व कोयत्याने वार करून खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अमनसिंग हा खासगी पेंटर होता. त्याने 29 डिसेंबरला कामावर जात असल्याचं सांगत स्कूटरवरुन घर सोडलं होतं. तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध सुरु केला होता. अखेर 31 डिसेंबरला त्यांनी पोलिसांकडे दाद मागितली. मुलगा अल्पवयीने असल्याने आम्ही बेपत्ता झाल्याची तक्रार अपहरण म्हणून ग्राह्य धरली. क्राइम ब्रांचने फोन डिटेल्सच्या माध्यमातून माहिती मिळवली. अखेर त्याचं कात्रज येथील लोकेशन मिळालं”.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या माहितीनुसार, “संशयितांनी अमनसिंगला कात्रजमध्ये बोलवण्यासाठी इंस्टाग्रामवरील एका मुलीच्या अकाऊंटचा आधार घेतला. इंस्टाग्रामवर त्यांनी मैत्री केली आणि चॅटिंगला सुरुवात केली. त्याला कात्रज घाटात भेटण्याची ऑफर दिली. यानंतर तो स्कूटवरुन पोहोचला होता. आरोपींनी त्याला तिथे बेशुद्द केलं आणि खेड-शिवापूरला डोंगरात नेलं. तिथे त्याला दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करुन ठार केलं. आम्ही सोशल मीडिया अकाऊंट असणाऱ्या त्या मुलीची माहिती मिळवत आहोत. तिने आपलं अकाऊंट कोणाला वापरायला दिलं होतं का हेदेखील जाणून घेत आहोत”.
पीडित तरुणाने आपल्याला खूप त्रास दिला होता असं आरोपींचं म्हणणं आहे. याच जुन्या रागातून त्यांनी बदला घेण्याच्या हेतून हत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपींनी मृतदेह सापडू नये यासाठी पुरला होता. आरोपींना कोर्टात हजर केलं असता 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.









