Search
Close this search box.

Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इंडिगो एअरलाईन्सच्या (Indigo Airlines) बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून, इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात (Ticket Price) मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30 हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पुणे विमानतळावर त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शुक्रवारी इंडिगोची 46 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील 23 उड्डाणांचा समावेश आहे. बाहेरील राज्यांतून पुण्यात येणारी 23 उड्डाणे देखील रद्द करण्यात आली होती. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले.

Indigo Crisis: तिकीट दरात मोठी उसळी; अनेक मार्गांवर 30 हजारांपेक्षा जास्त भाडे

विविध प्रवास संकेतस्थळांचा आढावा घेतला असता, इंडिगोव्यतिरिक्त इतर विमान कंपन्यांनी पुणे–मुंबई, मुंबई–नागपूर आणि नागपूर–पुणे मार्गावरील तिकीट दर 30 हजार रुपयांपेक्षा जास्त लावल्याचे स्पष्ट झाले. प्रवाशांची वाढलेली मागणी आणि उपलब्ध उड्डाणांची कमतरता यामुळे या कंपन्यांनी दर वाढवले आहेत.

Indigo Crisis: मुंबई–नागपूर विमानभाडे तब्बल 39 हजार रुपयांवर

नागपूर विमानतळावरही परिस्थिती गंभीर आहे. इंडिगोची सात ते आठ उड्डाणे दररोज रद्द होत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. इतर एअरलाईन्सने याचा फायदा घेत भाड्यात प्रचंड वाढ केली आहे. एका प्रवाशाच्या म्हणण्यानुसार मुंबई–नागपूर प्रवासासाठी 39 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. वैमानिकांची कमतरता, चेक-इन प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि संचालनातील विविध त्रुटींमुळे इंडिगोची सेवा कोलमडली आहे.

Indigo Crisis: 1000 हून अधिक फ्लाईट रद्द; प्रवाशांची प्रचंड गैरसोय

इंडिगोने शुक्रवारी देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी देशातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी उड्डाण करणारी सर्व देशांतर्गत विमाने मध्यरात्रीपर्यंत (11:59 वाजेपर्यंत) रद्द केल्याचे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ‘एक्स’वर जाहीर केले. यामुळे हजारो प्रवासी ताटकळले, काहींना रात्रभर विमानतळावरच थांबावे लागले. तर इंडिगोनं गेल्या चार दिवसांमध्ये 1000 हून अधिक फ्लाईट रद्द केल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

Indigo Crisis: व्हीआयपी प्रवाशांनाही त्रास; मुंबई विमानतळावर रात्र काढावी लागली

गुरुवारी रात्री मुंबई–नागपूर इंडिगो उड्डाण रद्द झाल्याने अनेक व्हीआयपी प्रवाशांना रात्रीभर मुंबई विमानतळावर थांबावे लागले. भाड्यांच्या अचानक झालेल्या वाढीमुळे सामान्य प्रवाशांनाही आर्थिक फटका बसला आहे.

Indigo Crisis: नवविवाहित जोडप्याची रिसेप्शनला ऑनलाइन उपस्थिती

इंडिगोच्या गोंधळाचा अनोखा फटका कर्नाटकातील हुबळीच्या नवविवाहित जोडप्याला बसला. हुबळीची मेधा क्षीरसागर आणि ओडिशाच्या भुवनेश्वरचा संगम दास दोघेही बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. यांचे लग्न 23 नोव्हेंबर रोजी झाले. वधूच्या गावी हुबळी येथे 4 डिसेंबरला रिसेप्शन आयोजित होते. त्यांनी 3 डिसेंबरची विमान तिकिटे बुक केली होती; परंतु इंडिगोची सेवा कोलमडल्याने ते दोघेही हुबळीला जाऊ शकले नाहीत. परिणामी त्यांना स्वतःच्या रिसेप्शनला ऑनलाइन उपस्थित राहण्याची वेळ आली.

Indigo Crisis: इंडिगोच्या विमानांची आजही अनेक शहरातली उड्डाणे रद्द 

– पुण्यातील इंडिगोची आज 42 विमान रद्द.

– श्रीनगरवरून उडणारी 18 विमाने रद्द.

– वाराणसीत इंडिगोच्या 22 विमानांचं उड्डाण रद्द.

– चंदिगडमध्ये इंडिगोकडून दहा विमानांचं उड्डाण रद्द.

– अहमदाबादमध्ये सकाळपासून 19 उड्डाणे रद्द.

admin
Author: admin

और पढ़ें