मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक (बेस्ट) प्रशासन एसी आणि नॉन-एसी बसेसचे किमान भाडे कमी करण्याचा विचार करत आहे. 3 किमी पर्यंतच्या लहान मार्गांवर, एसी बसेसचे किमान भाडे आता 12 रुपयांऐवजी 9 रुपये असू शकते. तर नॉन-एसी बसेसचे किमान भाडे 10 रुपयांवरून 7 ते 8 रुपये केले जाऊ शकते.
अलीकडेच बस भाड्यात वाढ झाल्यानंतर मोठ्या संख्येने कमी अंतराचे प्रवासी शेअर ऑटोकडे वळले आहेत. त्यामुळे बेस्टकडून हे पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक एसव्ही आर श्रीनिवास यांनी यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. ‘बेस्ट बसची भाडे व्यवस्था अधिक लवचिक करण्यासाठी आम्ही नवीन स्लॅब जोडण्याची शक्यता विचारात घेत आहोत. यामध्ये, ऑटोचे स्पर्धात्मक भाडे देखील विचारात घेतले जाईल’, असे ते म्हणाले.
हा निर्णय का घेण्यात आला?
बस भाड्यात अलिकडेच झालेल्या वाढीमुळे प्रवाशांचा ट्रेंड शेअर-ऑटोकडे वाढला आहे. विशेषतः फीडर मार्गांवर आणि लहान प्रवासात, प्रवाशांनी ऑटोला स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय मानलंय. त्यामुळे अशा प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट आता पुन्हा एकदा भाडे कमी करण्याची तयारी करत आहे. लवकरच या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि कदाचित नवीन दर लागू केले जाण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आमच्या खिशावरील भार कमी होईल, अशी आशा मुंबईकरांना आहे. महाराष्ट्रातील सरकारी संस्था असलेल्या बेस्टच्या बसेसमध्ये दररोज 25 लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. मुंबईत 9 मे पासून बेस्ट बसेसचे भाडे वाढवण्यात आले. 2019 पासून 9 मेपर्यंत बेस्टच्या नॉन-एसी आणि एसी बसेसचे किमान भाडे अनुक्रमे 5 रुपये आणि 6 रुपये होते.
