इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे तसेच इस्त्रायल आणि इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एअर इंडियाच्या 20 हून अधिक फ्लाईट्सना वळवण्यात आले आहे.
एआय 130 लंडनहून मुंबईकडे येणारी फ्लाईट व्हिएन्नाकडे वळवण्यात आली आहे. तर मुंबईहून लंडनकडे जाणारी एआय 129 फ्लाईट अर्ध्या वाटेतून परत मुंबईकडे माघारी आली आहे. मुंबई-न्यू यॉर्क एआय 119 फ्लाईट देखील परत मुंबईला आणण्यात आली आहे. तर लंडनहून दिल्लीकडे येणारी एआय 2018 फ्लाईट सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे वळवण्यात आली आहे. या तातडीच्या बदलांमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
एअर इंडियाच्या या फ्लाईट्स वळवल्या
AI130 – लंडन हीथ्रो – मुंबई – व्हिएन्नाकडे वळवले
AI102 – न्यू यॉर्क–दिल्ली – शारजाकडे वळवले
AI116 – न्यू यॉर्क–मुंबई – जेद्दाहकडे वळवले
AI2018 – लंडन हीथ्रो–दिल्ली – मुंबईकडे वळवले
AI129 – मुंबई–लंडन हीथ्रो – मुंबईकडे परत
AI119 – मुंबई–न्यू यॉर्क – मुंबईकडे परत
AI103 – दिल्ली–वॉशिंग्टन – दिल्लीकडे परत
AI106 – नेवार्क–दिल्ली – दिल्लीकडे परत
AI188 – व्हँकुव्हर–दिल्ली – जेद्दाहकडे वळवले
AI101 – दिल्ली–न्यू यॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे वळवले
AI126 – शिकागो–दिल्ली – जेद्दाहकडे वळवले
AI132 – लंडन हीथ्रो–बेंगळुरू – शारजाकडे वळवले
AI2016 – लंडन हीथ्रो–दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले
AI104 – वॉशिंग्टन–दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले
AI190 – टोरांटो–दिल्ली – फ्रँकफर्टकडे वळवले
AI189 – दिल्ली–टोरांटो – दिल्लीकडे परत
इराणमधील 12 हून अधिक लष्करी तळांवर हल्ला
शुक्रवारी पहाटे इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने जोरदार हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं असून, इस्रायलने लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रं आणि ड्रोनद्वारे बॉम्बवर्षाव केला. इराणी लष्कराचे महत्त्वाचे तळ आणि अण्वस्त्रं असलेली केंद्र इस्रायलच्या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य ठरली. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये मोठमोठे स्फोट झाले आणि त्याचे आवाज दूरपर्यंत ऐकू आले. इस्रायली लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इराणमधील 12 हून अधिक लष्करी तळांवर आणि अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक कमांडो जवान आणि अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे.
