आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष साजरा केला जात असून गणराय घरी आल्याने भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. अनेक मोठ्या मंडळांमनी मागील काही आठवड्यांमध्येच मूर्ती मंडपामध्ये आणली. तर बरेच घरगुती गणपतीही एक ते दोन दिवस आधीच विराजमान झाले असून आज गणरायांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मंडळाचा गणपती असो किंवा घरातला गणपती असो गणरायाची मूर्ती घरी आणताना तिचं तोंड झाकलेलं असतं. आपल्यापैकी अनेकांनी हे केलं असेल, बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि स्टोरीला गणपती आगमनाच्या फोटोंमध्येही गणरायाच्या चेहऱ्यावर कापड दिसत असेल. मात्र गणपतीची मूर्ती घरी आणताना तिचं तोंड का झाकलेलं असतं? यामागील लॉजिक काय आहे? हे 99 टक्क्यांहून अधिक लोकांना ठाऊक नाही. आज गणेश चतुर्थीनिमित्त याबद्दलच जाणून घेऊयात…
गणपती बाप्पाला घरी आणताना मूर्तीचे तोंड किंवा चेहरा स्वच्छ कपड्याने किंवा रुमालाने झाकून आणण्याची परंपरा महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे. यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशी अनेक कारणे आहेत. याच कारणांवर नजर टाकूयात…
जपण्याच्या उद्देशाने
गणपती बाप्पाचे मुख अत्यंत पवित्र मानले जाते. रस्त्यावरील धूळ, प्रदूषण, गोंगाट आणि बाह्य अपवित्रता असते. त्यामुळे बाप्पाला या सर्वांपासून जपण्याच्या उद्देशाने त्याचे तोंड झाकले जाते. काही ठिकाणी सगुण (भौतिक) आणि निर्गुण (अभौतिक) तत्त्व संतुलित राहावे म्हणूनही मूर्ती झाकण्याची प्रथा सांगितली जाते.
नकारात्मक ऊर्जा लागू नये
गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर आणि आकर्षक असते. गर्दीत अनेकांच्या नजरा पडल्यामुळे वाईट दृष्टी किंवा नकारात्मक ऊर्जा लागू नये म्हणून चेहरा झाकला जातो, असं गणेशभक्त मानतात. विशेषतः बालस्वरूपातील किंवा नवीन मूर्तीसंदर्भात ही श्रद्धा आहे.
प्राणप्रतिष्ठेशी संबंध
प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत मूर्तीला पूर्ण देवत्व प्राप्त झालेले नसते, अशी मान्यता आहे. प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत घरी आणलेली गणपतीची मूर्ती ही फक्त मातीची मूर्ती असते, असं मानलं जातं. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच देव त्या मूर्तीत वास करतात आणि ती जिवंत देवता मानली जाते. त्यामुळे आधी तोंड झाकून आणतात आणि स्थापना-पूजानंतरच रुमाल काढून दर्शन घेतले जाते. बाप्पाने प्रथम शुभ दृष्टीने घर पहावे अशी भावना असते.
आदर दाखवण्याचं माध्यम
चेहरा झाकून गणपतीची मूर्ती आणणे हे देवाप्रती आदर दाखवण्याचे प्रतीकही मानले जाते. प्रतिष्ठापना होईपर्यंत मूर्तीला पूर्ण देवरूप मानून दर्शन न देता झाकून आणतात.
चेहऱ्यावरील कापड कधी काढतात?
घरी आणल्यावर गणपती बाप्पाच्या मूर्ती निश्चित ठिकाणी बसवल्यानंतर, प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना पूजेच्या वेळी रुमाल काढला जातो. त्यानंतरच बाप्पाचे दर्शन घेतले जाते.
धर्मग्रथांमधील अनिवार्य नियम नाही, तरी…
विशेष म्हणजे गणपतीचं तोंड झाकण्याची ही परंपरा अथवा प्रथा कोणत्याही धर्मग्रंथांमध्ये अनिवार्य नियम म्हणून लिहिलेली नाही. सदर प्रथा कौटुंबिक आणि स्थानिक श्रद्धेनुसार पाळली जाते, असं तज्ज्ञ सांगतात. काही घरांमध्ये ही प्रथा नसते. तरीही महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी ही परंपरा अगदी आदराने पाळली जाते.








