मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) पाच अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम पाळले नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने येथे तपासणी केली असता रेफ्रिजरेटरमध्ये साचलेला बर्फ, खराब झालेला कच्चा माल, जमिनीवरील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांकडू नियमांचं उल्लंघन अशा अनेक गोष्टी आढळल्या आहेत. यानंतर त्यांच्यावर कारवाई करत अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
MCAच्या परमिट रूम , पॅव्हेललियन , मेडिटेररनीन , ओरिएंटल स्विंग आणि क्लबवाय & पेस्ट्री काउंटर वर FDA ने कारवाई केली असून अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 20 ऑगस्ट रोजी FDAकडून MCAच्या या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचे आढळले.
परमिट रूम मध्ये रेफ्रिजरेटरमध्ये बर्फ साचलेला आणि स्वयंपाकघरातील फरशी अस्वच्छ आढळली. काही कच्चा माल खराब अवस्थेत होता, तसेच खाद्यतेलाची नियमित तपासणी होत नसल्याचे आढळले. पवेलियन मध्ये रेफ्रिजरेटर आणि परिसर अस्वच्छ असल्याचे दिसून आले. खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने साठवले जात नसल्याचे आणि गोठवलेले पदार्थ योग्य पद्धतीने हाताळले जात नसल्याचेही तपासणीत निदर्शनास आले.
मेडिटेररनीन मध्ये स्वयंपाकाची उपकरणे स्वच्छ नसणे आणि अन्नपदार्थ योग्य तापमानात ठेवली जात नसल्याचं अधिकाऱ्यांच्या पाहणीत समोर आलं. ओरिएंटल स्विंग मध्ये रेफ्रिजरेशन यंत्रणा, स्वच्छता आणि अन्न हाताळणीत त्रुटी आढळल्या. क्लबवाय आणि पास्ट्री काउंटर मध्ये कामासाठी पुरेशी जागा नसणे, कच्चा माल योग्य पद्धतीने न ठेवणे आणि कर्मचाऱ्याने हातमोजे न वापरणे अशा प्रकारची उल्लंघनं दिसून आली.
संबंधित कंपनीकडे अन्न व्यवसायाचा वैध परवाना नसतानाही तिथून अन्न व्यवसाय केला जात असल्याचे आढळले. या सर्व त्रुटींमुळे MCAच्या पाचही अन्न आस्थापनांवर FDAकडून कारवाई करण्यात आली आहे.








