नागपुरमध्ये मध्यरात्री गॅस गळती झाली आहे. येथील गोधणी परिसरामध्ये क्लोरिन वायूची गळती झाल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मध्यरात्री अनेकजण झोपेत असतानाच ही गॅस गळती झाल्याने एकच गोंधळ उडाला. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या 40 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच गॅस गळती झालेल्या ठिकाणापासून 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
नेमकं झालं काय?
मिलालेल्या माहितीनुसार, गोधणी नगरपंचायतच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन गॅसची गळती झाली. कलेक्टर कॉलनीजवळील पाणी प्रकल्पातील टँकरमधून क्लोरीन वायूची गळती झाली. या गॅस गळतीमुळे या प्रकल्पात काम करणारे 8 ते 10 कर्मचारी आणि परिसरातील 20 ते 25 हून अधिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परिसरातील अनेक कुटुंबांना श्वास घेण्यात अडचण, डोळे जळजळ आणि इतर त्रासाची तक्रार केली. अनेक नागरिकांना मेयो रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांवर उपचार सुरु असून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी 4 ते 5 जण आयसीयूमध्ये आहेत. अग्निशमन दल, पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना इतर ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरात अजूनही क्लोरीनचा वास येत असला तरी आता प्रभाव मर्यादित आहे.
क्लोरीन गॅस किती धोकादायक?
क्लोरीन गॅस पिवळसर-हिरवा रंगाचा, तीव्र वास असलेला आणि हवेपेक्षा जड असतो. क्लोरीन गॅस श्वसनमार्गात, डोळ्यांमध्ये आणि त्वचेवर थेट संपर्क झाल्यास तीव्र जळजळ होते. थेट क्लोरीन गॅसच्या संपर्कात आल्यास डोळे, नाक आणि घशाची जळजळ होणे. डोळ्यातून सतत पाणी येतं. क्लोरीन गॅसमुळे डोळे, नाक लालसर होते. भरपूर खाज येण्याबरोबरच वेदनाही होतात. खोकला, छातीत जडपणा, श्वास घेण्यात अडचण, दम लागण्याचा त्रासही क्लोरीन गॅसमुळे होते. श्वसनावाटे शरीरात गेलेल्या क्लोरीन गॅसचे प्रमाण जास्त असल्यास फुफ्फुसांत पाणी साचू (ज्याला पल्मोनरी एडेमा म्हणतात) शकतं. क्लोरीन गॅसच्या संपर्कात आल्याने श्वसनक्रिया बंद पडून मृत्यूही होऊ शकतो. मळमळ, उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रासही क्लोरीन गॅस नाकावाटे शरीरात गेल्यास होतात.
याच वर्षी महाराष्ट्रात घडल्यात वायूगळतीच्चा तीन मोठ्या घटना
यापूर्वी याच वर्षी पुण्यातील कोंढवा/गंगाधाम येथे बंद पडलेल्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील जुने टँक आणि सिलिंडरमधून गळती झाली होती. यामुळे 24 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. यामध्ये 22 नागरिक आणि दोन अग्निशमन कर्मचारी होते. मुंबईतील पवईमधील आयआयएम कॅम्पसजवळ मे महिन्यात न वापरल्या जाणाऱ्या सीवेज ट्रीटमेंट प्लांटमधील जुन्या सिलिंडरमधून गळती होऊन 3 सुरक्षा रक्षक आणि तीन अग्निशमन दलाचे जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर याच वर्षी पालघरमधील बोईसर येथील तारापूर एमआयडीसीमध्ये श्री विनायक केमेक्स कारखान्यात गॅस गळती झालेली. साधारण दीड तासात यावर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.







