छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ‘खवड्या’ डोंगरावरुन पडून तिघांचा मृत्यू झाला. 18 वर्षीय कुणाल चांदगुडेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याला वाचवताना त्याचे वडील मुरलीधर चांदवडे (48) हे सुद्धा डोंगरकड्यावरुन पडले. डोळ्यासमोरच या दोघांना खाली पडताना पाहून कुणालची आई संगीता चांदवडे (42) यांनीही उडी मारुन स्वत:ला संपवलं. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे तीन तास डोंगरकड्यावर रंगलेल्या या आत्महत्या नाट्यामागे आयफोन असल्याची चर्चा आहे. या प्रकरणामगील आयफोन कनेक्शनची चर्चा नेमकी काय याबद्दल जाणून घेऊयात…
आयफोनसंदर्भात नेमकी काय चर्चा आहे?
छत्रपती संभाजीनगरच्या चर्चित आत्महत्या प्रकरणात 18 वर्षीय तरुणाने आयफोनसाठी आत्महत्या केल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियाबरोबरच छत्रपती संभाजीनगरमध्येही सुरू आहे. मात्र याबाबत थेट बोलायला कोणीही तयार नाही. प्रत्यक्षात गेले काही महिने हा मुलगा आयफोन वापरत होता. ज्यावेळेस आत्महत्या करू नको अशी विनवणी या मुलाला त्याची आई करत होती त्यावेळेस त्याने गळ्यातली चांदीची चैन आणि आपला आयफोन आईकडे फेकला होता त्यामुळे आयफोनसाठी हा मुलगा आत्महत्या का करेल असा प्रश्न पोलिसांसह सगळ्यांना पडलाय.
वादाचं गूढ तिघांसोबत संपलं
काहीजण हा मुलगा अपडेटेड आयफोन घेण्यासाठी मागे लागला होता अशीही चर्चा करत आहेत. आयफोनच्या हप्ते म्हणजेच ईएमआय भरण्यावर वडील आणि मुलांमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यातून मुलांना टोकाचे पाऊल उचललं अशाही चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात या भांडणामागील सत्य कुटुंबातील या तिघांशिवाय कोणालाही माहिती नाही आणि या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हे सत्य या कुटुंबासोबतच संपलंय.
या मुलाने यापूर्वीही केलेला आत्महत्येचा प्रयत्न
महत्त्वाचं म्हणजे आत्महत्या करणाऱ्या या तरुणांना याच डोंगरावर एक वर्षापूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस पोलिसांनी त्याची समजूत काढली होती आणि त्याला घरी नेलं होतं मात्र शुक्रवारी त्याच डोंगरावर तब्बल वर्षभरानंतर येऊन या मुलाने खरोखरच आत्महत्या केली आहे. आता या आत्महत्येच्या कारणाबाबत पोलीस सखोल तपास करत आहे त्यातूनच सत्य बाहेर येईलच मात्र वडील आणि मुलाचं फारसं पटत नव्हतं प्रथमदर्शनी ही माहिती पुढे आली आहे.







