जवळपास दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या विश्रांतीवर गेलेल्या पावसानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येसुद्धा पाऊस पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच मुंबई शहरासह उपनगरात रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील एकंदर पर्जन्यमानाचा कल पाहता पुढील 24 तासांसाठी मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाण्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस..
रविवारी रात्री 11.30 ते मध्यरात्री 3:30 वाजेपर्यंत ठाण्यात पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. अवघ्या 4 तासांमध्ये शहरात मुसळधार पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. जो आकडा एकूण 98 Mm असल्याचं निदर्शनास आलं. विजांच्या कडकडाटासह पावसाने ठाण्यात दमदार हजेरी लावल्याचं दिसून आलं.
तिथं पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यासह पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पारगाव, निरगुडसर परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं. या मुसळधार पावसामुळे शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं असून या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
कोणत्या जिल्ह्यांना IMDचा यलो अलर्ट
भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकत्याच जारी केलेल्या इशाऱ्यानुसार ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, नांदेड, हिंगोली आणि परभणीत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात ताशी 30- 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार सोमवारपासून पुढील तीन दिवस राज्यात प्रामुख्यानं कोकण किनारपट्टीसह घाट क्षेत्रात पावसाचा जोर वाढेल. यंदाच्या वर्षी तळकोकणातच बरेच दिवस रेंगाळलेला पाऊस आता पुढे सरकला असला तरीही त्यानं अपेक्षित वेग मात्र पडकलेला नाही. ज्यामुळं आता पुढील काही दिवसांत हा पाऊस नेमकी कशी प्रगती करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
29 जून ते 2 जुलैदरम्यान राज्यात प्रामुख्यानं उत्तर किनारपट्टी भागासह समुद्रात वादळी हवामानाचा अंदाज आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी इतका असेल, तर हा वेग 60 किमीपर्यंतही पोहोचू शकतो. ज्यामुळं या काळात किनाऱ्यानजीकसुद्धा मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना यंत्रणांनी दिल्या आहेत.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात होणारे वाऱ्याचे बदल आणि सक्रीय असणारी हवामान प्रणाली यामुळं 1 ते 2 जुलै दरम्यान तळकोकण, मराठवाड्यासह विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा जोर तुलनेनं अधिक असेल. पुढील चार ते पाच दिवसांत मुंबई, मध्य महाराष्ट्रातही पावसाची संततधार तर काही प्रसंगही पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. ज्यामुळं या पावसानं कमाल तापमानातही काहीशी घट होण्याचा अंदाज आहे.








