काहीशी विश्रांती घेत मुंबई आणि नवी मुंबईह राज्यात पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांसह इतरही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. विदर्भसुद्धा या पावसास अपवाद ठरला नाही. आठवड्याच्या अगदी अखेरीस, पुढील 24 तासांमध्ये मोसमी वाऱ्याची दिशा आणखी पुढं सरकणार असून, या वाऱ्यांना मिळालेल्या वेगामुळं राज्याच्या उर्वरित भागांमध्येसुद्धा पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज आहे. पहाटेच्या वेळी आणि दिवस मावळतीला गेल्यानंतर पावसाचे ढग दाटून येऊन अनेक ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली असून, प्रामुख्यानं घाटमाथ्यावर सरींचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर इथं घाटमाथ्यावर दृश्यमानचा कमी होईल ज्यामुळं यादरम्यान प्रवास करत असतानाही सतर्कता बाळगण्याचा इशारा यंत्रणांनी दिला आहे.
ज्याच्या काही भागांत पाऊस सक्रीय झाला असला तरीही काही भागांमध्ये त्याचा लपंडावाचा खेळ सुरूच आहे. त्यामुळं तूर्तास तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. तेव्हा आता येत्या दिवसांत हा पाऊस नेमका किती मनसोक्त बरसतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मुंबईतला पाऊस सुट्टीवर?
मंगळवारी रात्रभर बरसणारा पाऊस बुधवारी- गुरुवारी मात्र विश्रांती घेताना दिसला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस पडला होता. मात्र, हे कमी दाबाचं क्षेत्र विरल्याने पावसाचा जोर ओसरला. आता थेट जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान मान्सून कमकुवत राहणार असल्याने शुक्रवार ते रविवारदरम्यान कोणताही इशारा मुंबईला लादू करण्यात आला नाही. त्यामुळं मुंबईबाहेरच आठवडी सुट्टीला पावसाची मजा घेता येईल असं म्हणायला हरकत नाही.
देशभरातील मान्सूनचा आढावा घ्यायचा झाल्यास आयएमडीच्या माहितीनुसार या पावसानं चांगलाच वेग पकडला आहे. ज्यामुळं पुढील 3 ते 4 दिवसांत नैऋत्य मान्सून गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, बिहारच्या उर्वरित भागांमध्ये पुढे सरकेल. तर, उत्तराखंडच्या काही भागांमध्येसुद्धा जोरदार पावसाचा तडाखा बसेल. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 70 किमी इतका असू शकतो असाही इशारा आहे.








