उष्णतेचा कहर संपूर्ण महाराष्ट्राची होरपळ करत असताना मान्सूनच्या नुसत्या बातमीनंसुद्धा अनेकांच्या मनावर हळुवार फुंकर घातली गेली आहे. दुग्धशर्करा योग म्हणजे अबालवृद्धांची उत्सुकता आणि मान्सूनसाठी आसुसलेले डोळे पाहून जणू काही निसर्गसुद्धा पाघळला आणि अखेर अंदमानाच बहुप्रतिक्षित असा यंदाचा मान्सून दाखल झाला.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं अंदाज वर्तवल्यानुसारच यंदा मान्सून 16 मे 2026 रोजी अंदमानात दाखल झाला. अंदमानात मान्सून दाखल झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार अंदमानमध्ये मान्सूनच्या सरी कोसळल्या असून, प्रचंड काळे ढग दाटून आले, सोसाट्याचे वारे सुटले, समुद्रात जोरदार लाटा उसळल्या आणि दणक्यात मान्सूनच्या आनंदसरी बरसल्या. मान्सूनची गाडी यंदासुद्धा वेळेआधीच अंदमानात दाखल झाली, त्यामुळे आता महाराष्ट्रातही मान्सून वेळे आधीच दाखल होणार का, याकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे.
पोषक वातावरणामुळे यंदा मान्सूनचा प्रवास वेगवान
अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे आणि विषुववृत्तीय हिंदी महासागरात निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे यंदा मान्सूनचा प्रवास वेगवान झाला. हीच स्थिती कायम राहिल्यास मोसमी वाऱ्यांसह हा पाऊस 26 मे पर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. इथून त्याचा गोवा आणि तळकोकण रोखानं प्रवास सुरू होईल आणि त्यानंतर देशभर मान्सूनचा प्रभाव दिसून येईल.
अनेकदा मान्सून केरळात 1 जूनपर्यंत दाखल होतो. मात्र यंदा तो सुमारे सहा दिवस आधी पोहोचण्याचा अंदाज आहे. परिणामी महाराष्ट्रातही दरवर्षी येणारा हा हवाहवासा वाटणारा मोसमी पाहुणा 6 जूनपर्यंत महाराष्ट्रात, कोकणात बरसण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा देशात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी 92 टक्के पावसाचा अंदाज आहे. मोसमी वाऱ्यांवर एल निनोची वक्रदृष्टी असल्या कारणानं पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी अथवा संमिश्र असेल असं म्हटलं जात आहे. याशिवाय जूनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी असेल असाही अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा
एकिकडे मान्सूनचं अंदमानात आगमन झालेलं असताना राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये ढगांचा बदलणारा रंग आणि वाऱ्याचा वेग पाहता पाऊस आताच बरसतो की काय, असा प्रश्न पाडणारं चित्र पाहायला मिळेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान कोकणासह गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून वादळी वारेसुद्धा सुटतील. मात्र हा मान्सूनपूर्व पाऊस असेल याची नोंद घ्यावी. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापुरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.








