जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा (Petrol) तुटवडा निर्माण झाल्यामुळे बहुतांश पेट्रोलपंपांवर आज सकाळपासूनच वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लातूर (Latur) शहरात इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, या वाढत्या गर्दीमुळे पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात इंधनटंचाईची परिस्थिती कायम असून, अनेक पंपांवर साठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे इंधनाच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तर, शेतीच्या (Farmer) कामांनाही याचा फटका बसत आहे. दुसरीकडे बीडमध्येही पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वाहनधारकांच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
एकीकडे राज्यात कुठलाही इंधन तुटवडा नसल्याचे सरकार सांगत असताना दुसरीकडे डिझेल तुटवड्यामुळे ग्रामीण भागात परिस्थिती शहरापेक्षा अधिक बिकट झाली आहे. शेतामध्ये नांगरटीसारखी महत्त्वाची कामे इंधनाअभावी ठप्प झाली आहेत. ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने अनेक ट्रॅक्टर एकाच ठिकाणी उभे असल्याचे चित्र दिसत आहे. ट्रॅक्टर चालकांनीही स्पष्ट भूमिका घेतली असून डिझेल आणा, मगच काम करतो असे सांगितल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असून, उपलब्ध इंधन मागणीच्या तुलनेत अत्यल्प पडत आहे. या परिस्थितीमुळे शेतीकामांवर मोठा परिणाम होत आहे.
लातूर जिल्ह्यात पानगाव येथील 16 एकर शेती असलेले शेतकरी मयूर चव्हाण यांनी सांगितले की, मागील आठ दिवसांपासून डिझेल टंचाई वाढत चालली आहे. “एका वेळेला तीन हजार रुपयांचेच डिझेल मिळते, त्यात एक एकरही नीट होत नाही. ट्रॅक्टर चालक लाईनला उभे राहत नाहीत. पाच-पाच, सहा-सहा तास रांगेत उभे राहून केवळ तीन हजार रुपयांचे डिझेल मिळत आहे. खत, बियाणे आणि आता डिझेलसाठीही रांगेत उभे राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही होताना दिसत आहे. डेली वाहतूक करणारे छोटा हत्ती, मोठा हत्ती आणि टेम्पो चालकांना इंधनाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. लातूर-धाराशिव, लातूर-सोलापूर, लातूर-नांदेड या मार्गांवर फळे व भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनचालक आणि मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुरवठा विभाग 57 पेट्रोल पंपाची माहिती घेणार (Petrol disel shortage)
जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्या मते, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकाच वेळी इंधन खरेदी केली. प्रत्येक पेट्रोल पंपावर साधारणतः तीन दिवस पुरेल इतका साठा असतानाही तो एका दिवसातच संपल्याने पॅनिक परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा पुरवठा विभागाने लातूर जिल्ह्यातील सर्व 57 पेट्रोल पंपांवरील साठ्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून, आज संध्याकाळपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवून इंधनपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, इंधनटंचाईमुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाच्या उपाययोजनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीडमध्येही 5 दिवसांपासून इंधन टंचाई (Beed Petrol pump line)
बीडमध्ये सलग पाच दिवसांपासून इंधनाचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे. इंधनाची गाडी पेट्रोल पंपावर दाखल होताच वाहनधारकांच्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर लागत आहेत. भर उन्हात दुचाकी स्वारांसह रिक्षा चालकांची मोठी गर्दी पेट्रोल पंपावर दिसून येतेय. जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा. या अनुषंगाने कालच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या दालनात पेट्रोल पंप चालकांची बैठक पार पडली. मात्र, इंधनाची टंचाई अद्याप तरी दूर झालेली नाही. सलग पाच दिवसांपासून ही परिस्थिती बीडमध्ये पाहायला मिळते.








