महाराष्ट्रात उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पार 40 च्या वर गेला आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 50 अंशापर्यंत जाऊ शकते असा देखील इशारा देण्यात आला आहे. तीव्र उष्णतेमुळे, सरकारने एक नवीन एसओपी जारी केली आहे. कामगारांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत.
मुंबई ते पुणे, नागपूर ते नाशिकपर्यंत तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान 40 अशंपर्यंत पोहतले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव परिसर सर्वाधिक उष्ण होता, जिथे 41.9°C कमाल तापमानाची नोंद झाली. कोरेगाव पार्कमध्ये 41.8° अंश तर शिवाजीनगरमध्ये 40.7° अंश तापमानाची नोंद झाली. चिंचवडमध्येही तापमान 40 अंशापर्यंत पर्यंत पोहोचले. तर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
तीव्र उष्णता, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने नवीन प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे. या एसओपीनुसार विशेषतः बाहेर काम करणाऱ्या कामगारांच्या कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. उन्हातान्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हायड्रेशन ब्रेक अनिवार्य करण्यात आला आहे. सरकारच्या निर्देशानुसार, बांधकाम, लॉजिस्टिक्स अशा बाहेर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहाटे आणि संध्याकाळी काम करण्याची परवानगी देण्यात आली असून, दुपारच्या वेळी कामगारांना काम करण्यास मनाई करण्यात आली असून संबधीत व्यवस्थापनांनी याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्याच्या कामाच्या वेळा बदलल्या
उष्णतेचा तडाखा वाढत असल्याने नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कामगारांच्या कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 अशा वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत काम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ही वेळ दिवसातील सर्वात उष्ण मानली जाते, जेव्हा उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका सर्वाधिक आहे.
हायड्रेशन आणि आरोग्याकडे लक्ष
एसओपीनुसार सर्व कामाच्या ठिकाणी पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस आणि इलेक्ट्रोलाइट्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमितपणे हायड्रेशन ब्रेक देणे आणि कामगारांसाठी सावलीच्या विश्रांतीच्या जागा उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. कामगारांना कडक उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी कीलिंग एरिया आणि तात्पुरत्या शेड उभारण्याचे निर्देश सरकारने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
कोणत्या क्षेत्रांतील कामगारांना हे नियम लागू होतील?
बांधकाम, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, स्वच्छता सेवा, वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्यावरील विक्री यांसारख्या, जेथे कामगार थेट सूर्यप्रकाशात काम करतात, अशा सर्व क्षेत्रांना ही नियमावली लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागांना सतर्कतेचे आदेश
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उष्माघातावरील उपचारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णवाहिका सेवादेखील अधिक सक्षम करण्यात आली आहे. मुंबईत लागू करण्यात आलेले हे नवीन वेळापत्रक, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.









