अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील चर्चेची पहिली फेरी फिस्कटली असून होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन वाद पेटला आहे. अमेरिकेने होर्मुझची नाकेबंदी करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जगभरात पुन्हा एकदा तेलाचे संकट निर्माण होणार का? अशी शंका उपस्थित होत आहे. यादरम्यान भारतात 14 एप्रिलला इंधनाचे दर स्थिर आहेत. पश्चिम आशियातील तणाव आणि महत्त्वाच्या सागरी मार्गांमध्ये व्यत्यय निर्माण झालेला असतानाही जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारपेठांमध्ये मात्र अद्यापही अस्थिरता कायम आहे. राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे निर्माण झालेल्या वाढत्या राजकीय संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर, इंधनाच्या दरांमधील ही स्थिरता दिसून येत आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा किरकोळ विक्री दर प्रति लिटर 94.77 रुपये इतकाच कायम आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 87.67 रुपये इतका आहे.
मुंबईमध्ये मात्र इंधनाचे दर तुलनेने अधिक आहेत. येथे पेट्रोल 103.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल सुमारे 90.03 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर अजूनही 100 रुपये प्रति लिटरच्या वर आहेत, तर डिझेलचे दर मात्र 100 रुपयांच्या खालीच कायम आहेत.
महत्वाच्या शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
| शहर | पेट्रोल (प्रती-लिटर) | डिझेल (प्रती लिटर) |
| दिल्ली | 94.77 | 87.67 |
| हैदराबाद | 107.50 | 95.70 |
| कोलकाता | 105.45 | 92.02 |
| मुंबई | 103.54 | 90.03 |
| बंगळुरु | 102.92 | 90.99 |
| चेन्नई | 100.84 | 92.39 |
भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कशावरुन ठरतात?
पेट्रोल पंपांवरील इंधनाच्या किंमती जागतिक, आर्थिक आणि देशांतर्गत घटकांवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किंमत यावर हे दर अवलंबून असतात. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींसाठी कच्चं तेल हाच मुख्य कच्चा माल आहे आणि ग्राहकांना अंतिमतः किती पैसे मोजावे लागतात, यावर याचाच सर्वात मोठा परिणाम होतो.
डॉलरच्या तुलनते रुपयाचं मूल्य हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे, कारण भारत आयात केलेल्या कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होतो, तेव्हा कच्च्या तेलाच्या खरेदीचा खर्च वाढतो, ज्याचा थेट परिणाम किरकोळ इंधनाच्या वाढलेल्या किमतींवर होऊ शकतो.
महाराष्ट्राच्या मुख्य शहरांमधील दर
| शहर | पेट्रोल | डिझेल |
| मुंबई | 103.54 | 90.03 |
| पुणे | 103.99 | 90.52 |
| नाशिक | 104.74 | 91.25 |
| नागपूर | 104.02 | 90.58 |
वेगवेगळ्या शहरांमध्ये किमतींमध्ये तफावत का असते?
केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांनी आकारलेले कर यावर प्रत्येक राज्यातील दर ठरतात, ज्यामुळे त्यात तफावत असते. वाहतुकीचा खर्च, तसेच मागणी आणि पुरवठ्याची सध्याची स्थिती हे घटकही, ग्राहकांना पंपावर दिसणाऱ्या किरकोळ किमतीवर परिणाम करत असतात.









