सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात जमिनीच्या वादातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सावंतवाडी (sawantwadi) तालुक्यातील ओवळीये-मधलीवाडी येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाने हिंसक वळण घेतले असून, एका 65 वर्षीय महिलेची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सरस्वती सावंत असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी पिता-पुत्राला ताब्यात घेतले आहे.
Sindhudurg Crime News : नेमकी घटना काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओवळीये येथील सावंत कुटुंबातील दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. शनिवारी सरस्वती सावंत या आपल्या मुलासोबत (एकनाथ सावंत) घराशेजारील शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तिथे शेजारी राहणारे विजय कृष्णा सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत हे आले. “तुम्ही आमच्या जमिनीत काय करता?” असा सवाल करत त्यांनी वादाला सुरुवात केली.
सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झाले. संतापलेल्या विजय आणि रघुनाथ या पिता-पुत्राने सोबत आणलेल्या कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर भीषण वार केला. हा हल्ला इतका भयानक होता की, सरस्वती सावंत यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्या जागीच कोसळल्या.
Sindhudurg Crime News : मुलाने दिली पोलिसांना माहिती
आपल्या डोळ्यादेखत आईवर झालेला हा जीवघेणा हल्ला पाहून मुलगा एकनाथ हादरून गेला. त्याने तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सरस्वती सावंत यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
Sindhudurg Crime News : आरोपी पिता-पुत्र जेरबंद
घटनेनंतर सावंतवाडी पोलिसांनी वेगाने हालचाली करत संशयित आरोपी विजय कृष्णा सावंत आणि रघुनाथ विजय सावंत या पिता-पुत्राला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे ओवळीये गावात प्रचंड खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे. जमिनीच्या एका तुकड्यासाठी शेजाऱ्यांनी एका वृद्ध महिलेचा जीव घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.









