इराण-इस्रायमधील युद्ध 28 व्या दिवशीही सुरुच आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष निवलण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाही आहेत. दरम्यान मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान एक प्रतिकात्मक कृती म्हणून इराणने इस्रायलच्या दिशेने डागलेल्या क्षेपणास्त्रांवर “भारताच्या जनतेचे आभार’ मानणारे संदेश लिहिले आहेत. या मिसाईल्सवर ‘Thank You People of India’ असं लिहिण्यात आलं होतं.
मुंबईतील इराणच्या दूतावासाने आणि इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी हे व्हिडीओ ऑनलाइन शेअर केले आहेत. यामध्ये इराणच्या एरोस्पेस दलाचे जवान मिसाईल्स इस्रायलवर डागण्यापूर्वी निळ्या रंगाच्या मार्करचा वापर करून त्यावर “भारतातील जनतेचे आभार” (Thank you to people of India) अशा स्वरूपाचे संदेश लिहिताना दिसत आहेत.
स्पेन, पाकिस्तान आणि जर्मनी येथील लोकांनाही अशाच प्रकारचे संदेश पाठवण्यात आल्याचं समजत आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत असणाऱ्या युद्धादरम्यान इराणप्रती सहानुभूती बाळगणाऱ्या देशांपर्यंत पोहोचण्याचा हा एक व्यापक प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. इराणच्या ‘Press TV’ या वाहिनीनुसार, हे संदेश अशावेळी समोर आला आहे जेव्हा इराणने आपल्या लष्करी मोहिमेची 83 वी लाट असा उल्लेख केला आहे. ही मोहीम ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4’ चाच एक भाग असून, ती ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) द्वारे राबवण्यात आली होती.
IRGC ने एका अधिकत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, या लाटेत संपूर्ण प्रदेशातील अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या प्रमुख लष्करी मालमत्तांना लक्ष्य करण्यात आलं. ‘प्रेस टीव्ही’च्या वृत्तानुसार, यामध्ये अश्दोद येथील तेल साठवणूक केंद्रे, मोदीनजवळील लष्करी ठिकाणे आणि अमेरिकेचे लष्करी माहिती-विनिमय केंद्र यांसारख्या पायाभूत सुविधांचा समावेश होता.
या निवेदनात अल-धाफ्रा आणि अल-उदेरी येथील अमेरिकन तळांवर, तसेच अली अल-सालेम हवाई तळ आणि शेख ईसा तळावरील सुविधांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. इराणने सांगितले की, या कारवाईसाठी त्यांनी दीर्घ आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे, अचूक मारा करणाऱ्या यंत्रणांचे (precision-strike systems) आणि ड्रोनचे मिश्रण वापरले; तसेच ही मोहीम यशस्वीरित्या पार पडल्याचा दावाही त्यांनी केला.
इराण भारताचे आभार का मानत आहे?
भारताचा हा उल्लेख अशावेळी आला आहे, जेव्हा संघर्षकाळात दोन देशांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधोरेखित होत आहेत. संघर्षामुळे इराणने अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांसाठी ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ बंद केली असताना भारतीय जहाजांना मात्र सुरक्षितपणे जाण्यास परवानगी देत आहे. इराणनेही याला दुजोरा दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, ‘मैत्रीपूर्ण’ मानल्या जाणाऱ्या मोजक्याच देशांमध्ये भारताचा समावेश होतो. आणि त्यामुळे प्रदेशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असली तरीही, भारताच्या जहाजांना कोणत्याही प्रकारे रोखले जाणार नाही”.
तसंच दुसरीकडे भारतीयांनी आणि खासकरुन काश्मीरमधील नागरिकांनी माणुसकी दाखवत इराणला आधार दिला आहे. अलीकडील काही आठवड्यांत, जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांतील नागरिकांनी इराणमधील संघर्षामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी देणगी मोहिमांचे आयोजन केले आहे. या देणग्यांमध्ये रोख रक्कम आणि दागिन्यांपासून ते घरगुती वस्तूंपर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे.









