पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत सध्या संपूर्ण जगाची चिंता वाढवणाऱ्या अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इराण युद्धातून उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच या युद्धामुळे ऊर्जा पुरवठा साखळी आणि महागाईवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असंही अधोरेखित केलं आहे. याआधी लोकसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी, “कोरोनाच्या महामारीच्या काळातही आपण अशा आव्हानांचा सामना एकजुटीने केला आहे. आता, पुन्हा एकदा त्याच प्रकारे सज्ज राहण्याची आपल्याला गरज आहे,” असं आवाहन केलं होतं.
लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि परिस्थिती सांभाळण्यासाठी सरकार सर्व आघाड्यांवर काम करत असल्याचंही नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, “मी नागरिकांना प्रत्येक आव्हानासाठी तयार राहण्याचं आवाहन करतो. या युद्धाचे परिणाण दीर्घकालीन असू शकतात. पण मी लोकांना आश्वासन देतो की, सरकार अलर्ट असून देशहित सर्वोच्च प्राथमिकता आहे”.
पंतप्रधानांनी राज्यांना एक टीम असल्याप्रमाणे एकत्रितपणे काम कऱण्याचं आणि करोना काळात ज्याप्रकारे आव्हानांचा सामना केला त्याप्रकारे काम कऱण्याचं आवाहन केलं. “पुढील काळात येणारी आव्हाने आपली कसोटी पाहतील. मी सर्व राज्यांना आवाहन करतो की त्यांनी पुढाकार घेऊन काम करावं. कारण कठीण काळात कामगार आणि समाजातील दुर्बल घटकांनाच सर्वाधिक फटका बसत असतो. आपल्या स्थलांतरित कामगारांच्या संरक्षणासाठी आवश्यक पावलं उचलली गेली पाहिजेत. राज्य सरकारांनी काळाबाजार रोखण्याबाबतही सतर्क राहावं. अशा काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
‘युद्ध सुरु राहिल्यास गंभीर परिणाम’
भारताने संवादाचा मार्ग स्विकारला असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांसह यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांशी आम्ही सतत संपर्कात आहोत. या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता, जर हे युद्ध असेच सुरू राहिले, तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील. आमचे आर्थिक पायाभूत घटक (fundamentals) आजही भक्कम आहेत आणि भारतावर होणारा प्रतिकूल परिणाम किमान राहील, याची खात्री करण्यासाठी आम्ही धोरणात्मक पातळीवर काम करत आहोत असंही त्यांनी म्हटलं.
पश्चिम आशियातील या संघर्षामुळे आतापर्यंत जे नुकसान झाले आहे, त्यातून सावरण्यासाठी जगाला बराच मोठा कालावधी लागेल असंही त्यांनी सांगितलं आहे. आगामी काळात हे संकट आपली एक मोठी कसोटी पाहणार आहे असं त्यांनी सांगितलं.
कोविड महामारीच्या काळात आपण प्रशासनाचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवला होता. त्याच भावनेने आणि त्याच उत्साहाने आपण पुढे वाटचाल करत राहिले पाहिजे. सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच, हे गंभीर संकट परतवून लावण्यात देशाला निश्चितपणे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.









