अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून, त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची (Gas) तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे, आणि याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक 150 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरातही 60 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे गणित बिघडले आहे. त्यातच, गॅस सप्लायही काही शहरांत बंद पडल्याचे पाहायला मिळते. पुण्यातील (Pune) विद्युत गॅस दाहिनीलाही याचा फटका बसला आहे.
सध्या गॅस सप्लाय कधी सुरळीत होईल, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही. हॉटेल मालकांचा सरकारकडे असा आग्रह आहे की, त्यांनी त्वरित सहकार्य करून गॅस पुरवठ्यात सुधारणा करावी. कमर्शियल एलपीजी गॅस पूर्णपणे बंद असल्यामुळे हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नाही. परिणामी कामकाजावर गंभीर अडथळा निर्माण झाला आहे, आणि उद्योगाची दिनचर्या प्रभावित होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही होताना दिसत आहे.
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. येथे एकूण पाच गॅस दाहिन्या असून, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. गॅस उपलब्ध नसल्यामुळे सध्या अंत्यसंस्कार विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक पद्धतीने लाकडांवरच करण्यात येत आहेत. दरम्यान, या संदर्भात गॅस दाहिनी चालवणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
गॅस दरवाढीमुळे महिलांच्या तक्रारी
पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. महिलांचे म्हणणे आहे की, गॅसचे दर वाढत आहेत, तेलाचे दर वाढत आहेत, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. मात्र आमचे पगार काही वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर अनेक वेळा वेळेवर गॅस मिळत नाही, अशी तक्रारही महिलांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गॅस तुटवड्याचे वृत्त फेटाळले
गॅस तुटवड्यांसदर्भातील वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. माध्यमांनी नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करू नये. जी परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळत आहे. वेगवेगळ्या बातम्या दाखवून नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे हे देशाच्या हिताचं नाही. केंद्र सरकारने याबद्दल स्पष्टपणे सांगितला आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी गॅसच्या तुटवड्यासंदर्भात माहिती दिली.









