Search
Close this search box.

‘चांगलं काम करणार त्यांना पक्ष संधी देणार’, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी मिळताच DCM शिंदेंचं स्पष्ट मत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता धामधूम सुरू आहे ती म्हणजे राज्यसभा निवडणुकीची आणि नव्या सत्तासमीकरणांची. याचदरम्यान शिवसेना शिंदे पक्षाकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक असायची, एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या महिला आघाडीला संधी देत सत्तेत वाटा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी ग्राऊंड झिरोवर काम करणाऱ्या महिलांना संधी दिल्याचा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं इथं स्पष्ट होत आहे. आपल्या या निवडीसंदर्भात माध्यमांशी संवाद साधतानासुद्धा एकनाथ शिंदेंनी महत्त्वाचा संदेश सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला.

हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष… 

‘हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्याचमुळे ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून राज्यसभेची संधी दिली आहे. त्यांनाही याची काहीच कल्पना नव्हती. मात्र, शेवटी शिवसेनेमध्ये सामान्यकार्यकर्त्याला पद देण्याचं काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून आम्ही करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी दिली आहे. त्या राज्यसभेमध्ये पक्षाची भूमिका आणि शिवसेना पक्षाचं काम, पक्षाची ध्येय्यधोरणं आणि मागील साडेतीन वर्षांमध्ये केलेलं काम त्या नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवतील आणि शिवसेना राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षातचं काम त्या नक्कीच पोहोचवतील’, अशी खात्री शिंदेंनी व्यक्त केली.

दिल्लीदरबारी पोहोचणार महाराष्ट्राचे प्रश्न 

महाराष्ट्राचं काम असो किंवा देशाचं काम; काही दुर्गम भागातील प्रश्नांसह सामान्यांच्या हिताच्या प्रश्नांना त्या राज्यसभेमध्ये प्राधान्य देतील असं म्हणत शिवसेनेनं केलेली निवड ही अतिशय सार्थ ठरेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम हे या सोलापूरमधील अतिशय सर्वसामान्य घरातील आमची बहीण करेल असंच ते म्हणाले.

वाघमारेंनी कधीच आपल्याकडे कोणती मागणी केली नव्हती, राज्यसभेचा विषयही त्यांनी कधी काढला नव्हता, त्यामुळं त्यांच्यासाठी हा निर्णय पूर्णपणे अनपेक्षित होता असं सांगत शिवसेना आणि आपला विश्वास ज्योती वाघमारे सार्थ ठरवतील याचाच पुनरुच्चारही त्यांनी केला. वाघमारे यांच्या निवडीमुळं कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एक चांगला संदेश गेला असून, पक्षासाठी पक्षाच्या ध्येय्य धोरणांसाठी चांगलं काम केल्यास, समाजासाठी प्रामाणिक काम केल्यास पक्ष त्यांचाही विचार करत असतो. मीसुद्धा सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळं जो कार्यकर्ता चांगलं काम करेल त्यांना चांगली आणि अशीच संधी मिळेल असं शिंदे म्हणाले.

admin
Author: admin

और पढ़ें