महापालिका निवडणुकांचा प्रचार अधिकृतपणे संपला असला तरीही या प्रचारतोफा अद्यापही थंडावल्या नसून यामागे कारण ठरत आहे ते म्हणजे निवडणूक आयोगानं दिलेल्या एका मुभेचं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा करण्यासाठीच्या पत्रकार परिषदेदरम्यानच आयोगानं मनपा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असला तरीही घरोघरी जाऊन प्रचार करता येणार असल्याची मुभा दिली आणि यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह आयोगालाही निशाण्यावर घेतलं. यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊतसुद्धा मागे राहिले नाहीत.
14 जानेवारी 2026 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राऊतांनी माध्यमांशी संवाद साधतानाच सुरुवात केली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोंडात तिळगूळ पडो… असं म्हणत. निवडणुकीनंतर राजकीय किल्मिषं दूर ठेवून मुंबई, महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे असं म्हणत त्यांनी प्रचार संपता संपता आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला आहे हा खोचक टोला लगावला. ‘प्रचार संपला तरीही प्रचार करता येण्याचा हा तिळगूळ… तोही कसा घराघरात जाऊन’, असं म्हणत त्यांनी आयोगाच्या निर्णयावर निशाणा साधला.
हिंदू मुसलमान आणि पैशांचा वापर…
‘सध्या वातावरण असं आहे की घरोघरी पैशांचं वाटप सुरु. साडीतून, वृत्तपत्रातून पैशांची पाकिटं कार्यकर्ते घरोघरी पोहोचवत आहेत आणि आता तर त्यांना मुभा मिळाली आहे. म्हणून हा नियम मोडून हा तिळगूळच आयोगानं दिलाय का? असा प्रश्न उभा राहत आहे. आज दिवसभरामध्ये पैसे देणाऱ्यांना बदलडण्याचं नाट्य अधिक प्रमाणात घडू शकतं. कारण, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं आहे. हिंदू मुसलमान आणि पैशांचा वापर याशिवाय हे निवडणुका जिंकणार नाहीत. यांना कोणताही विचार नाही. फक्त पैशांचं वारेमाप वाटप, सत्तेचा गैरवापर याशिवाय यांच्याकडे कोणतीही मोठी ताकद दिसत नाही.’ असं राऊत म्हणाले.
दिसेल तिथे ठोका…
राज आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्याची आठवण कतरून देत त्यांनी सांगितलं आहे दुबार मतदार दिसेल तिथे ठोका, तरच महाराष्ट्र वाचेल असं राऊत आग्रही सूरात म्हणाले. लोकशाहीच्या रक्षणासाठी अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची संस्था, ठोकणाऱ्यांन आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना घरोघरी प्रचाराचा दिवस हा राज्य निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना खास लक्ष्मीदर्शनासाठी दान केला आहे. पैसे कोणाकडे आहेत? शिंदे आणि भाजपकडे आहेत. पैसा येतो कुठून? अजित पवारांनी सांगितलं. कशा प्रकारे शेकडो कोटींच्या फायली आल्या…. हे सगळ्यांच्या बाबतीत आहे असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. राज्यातील निवडणूक आयोग आणि भ्रष्टाचापर विरोधी पथक काय करतंय? ते काही करणार नाहीत म्हणत त्यांनी यंत्रणांच्या कारभारावरही सवाल उपस्थित केला.
‘ब्लॅकमेल करुन स्वार्थ साधण्याचा प्रकार’
“गुप्तपणे एकमेकांच्या फाईल काढत आहेत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करत आहेत. शिदेंचं काही काढलं की ते फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काही बोललं की ते शिंदे, पवारांना ब्लॅकमेल करणार. या महाराष्ट्राच्या राजकारणात, सत्तेत ब्लॅकमेल करुन स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरु आहे,” असा आरोप यावेळी त्यांनी केला.









